पुणे : खराडी बायपास चौकात भरधाव मोटारीने एका मोटारीला धडक दिली. अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोटारचालकाला अपघातग्रस्त मोटारचालकाने अडविण्याचा प्रयत्न केला. पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोटारचालकाने त्याला फरपटत नेले, तसेच मोटारचालकाने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी मोटारचालक विष्णू साबळे (वय २२, पिंपरी सांडस, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सचिन चव्हाण यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी बायपास चौकातून मोटरचालक विष्णु साबळे हा मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास भरधाव वेगाने निघाला होता. त्या वेळी त्याच्या मोटारीने एका मोटारीला पाठीमागून धडक दिली. मोटारीचे नुकसान झाल्याने मोटारचालक उतरला. मोटारचालकाने साबळे याला अडविण्याचा प्रयत्न केला. साबळेने मोटारचालकाच्या अंगावर मोटार घातली आणि त्याला फरपटत नेले. त्या वेळी साबळे याला पोलीस शिपाई चव्हाण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. साबळे याने चव्हाण यांच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी साबळे याला पकडले.