प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि त्यांचा स्मृतिदिन असे दुहेरी औचित्य साधून जीए कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक गॅलरीच्या वतीने रविवारपासून (११ डिसेंबर) दोन दिवस नाट्यानुभवासह विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा- राज्यपालांविरोधात पुण्याच्या माजी महापौरांचे राजभवनापुढे धरणे आंदोलन

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रविवारी (११ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात भरतसिंग पाटील लिखित ‘जी. ए. अज्ञेयाचे यात्रिक- आदिबंधात्मक शोध’ या पीएच. डी. प्रबंधावरील पुस्तकाचे प्रकाशन डॉ. वंदना बोकील – कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत या वेळी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर  ‘आसरा व सोयरे’ या जीएंच्या दृष्टांतकथांवरील दृक्-चित्रपटाचे सादरीकरण कस्तुरी आफळे करणार आहेत. ‘द जिनिअस’ नाशिक प्रस्तुत जी. एं.च्या साहित्यावर आधारित महेश आफळे लिखित आणि प्रविण काळोखे दिग्दर्शित ‘मंथरमाया’ हा द्विपात्री नाट्यानुभव प्रशांत केळकर आणि निषाद वाघ सादर करणार आहेत.

हेही वाचा- पुणे : ‘षड्ज-अंतरंग’मध्ये दिवंगत कलाकारांच्या आठवणींना उजाळा; ‘शताब्दी स्मरण’ प्रदर्शनात पं. भीमसेन जोशी यांची छायाचित्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस. एम. जोशी सभागृह येथे सोमवारी (१२ डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता परचुरे प्रकाशनातर्फे ’स्मरण  जी.एं.च” या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल आणि प्रकाशक अप्पा परचुरे उपस्थित राहणार आहेत. जीएंच्या ‘फेड’ या कथेचे अभिवाचन ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष करणार आहेत. तर दृश्यम कम्युनिकेशनतर्फे ‘एक आगळे वेगळे स्मरण जी.एं.’चे हा कार्यक्रम सायली खेडेकर आणि राहुल नरवणे सादर करणार आहेत, असे जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी सांगितले.