पुणे : मुसळधार पावसामुळे झाडाची फांदी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडीतील पोकळे वस्ती परिसरात शनिवारी रात्री घडली. महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

योगेश ज्ञानदेव वानेरे (वय २९, रा. सध्या रा. पोकळे वस्ती, बिबवेवाडी, मूळ रा. वाघुड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनीद दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी शहरात मुसळधार पाऊस झाला. रात्री साडेअकराच्या सुमारास योगेश वानेरे आणि त्याचा मित्र सुमीत बगाडे ओटा वसाहतीतील महादेव मंदिराजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी झाडाची मोठी फांदी तुटली आणि योगेशच्या डोक्यात पडली. योगेशचा मित्र सुमीत बचावला. झाडाची फांदी डोक्यात कोसळल्याने योगेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे: पावसामुळे आवक कमी; पालेभाज्यांचे महिनाभर दर तेजीत

या घटनेची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अश्विनी राख, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

झाडांच्या फांद्या जीवघेण्या; उद्यान विभागाकडून काणाडोळा

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील झाडांच्या वाळलेल्या फांद्या जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी धोकादायक फांद्या उद्यान विभागाकडून काढण्यात येतात. फांदी कोसळून गंभीर दुर्घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. १९ मार्च रोजी दुचाकीस्वार महिलेच्या अंगावर झाडाची फांदी कोसळण्याची घटना जंगली महाराज रस्त्यावर घडली होती. सुदैवाने या घटनेत महिला बजावली होती.

हेही वाचा : “समुद्र नसल्याची पुणेकरांना खंत, म्हणून भाजपाने…”, पहिल्या पावसानंतरची दयनीय स्थिती पाहून जयंत पाटलांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फांद्या कोसळून झालेले मृत्यू

ओंकारेश्वर मंदिराजवळ चहाच्या टपरीवर थांबलेल्या कसबा पेठेतील अभिजीत गुंड (वय ३२) यांच्या डोक्यात अचानक फांदी कोसळली. बँक कर्मचारी असलेल्या अभिजीत यांचा त्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर जाग आलेल्या उद्यान विभागतील कर्मचाऱ्यांनी ओंकारेश्वर मंदिराजवळच्या झाडांच्या फांद्या काढल्या होत्या. आपटे रस्ता परिसरात तीन वर्षांपूर्वी फांदी कोसळून एका अपंग महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.