पिंपरी : नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून लाकडी फळीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. चाकण येथे ही घटना घडली.

बंटीसिंह नरेंद्रसिंह परमार (वय ३०, रा. मध्यप्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार हौशीराम गाडेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटीसिंह आणि आरोपी हे एकत्र राहण्यास होते. आरोपीला त्याच्या नातेवाईक महिलेसोबत बंटीसिंह याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. १३ मे रोजी रात्री बंटीसिंह घरी झोपलेला असताना आरोपीने लाकडी फळीने त्याच्यावर हल्ला केला. बंटीसिंहच्या तोंडावर जोरजोराने लाकडी फळी मारून त्याला गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार चालू असताना १९ मे रोजी बंटीसिंह याचा मृत्यू झाला.दरम्यान, आरोपीने त्याच्या घरात पडलेले रक्त पुसून टाकत पुरावा नष्ट केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक गावडे तपास करीत आहेत.