सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बेळगाव येथील शाखेला मान्यता देण्याचा निर्णय बुधवारी (२४ सप्टेंबर) घेण्यात येणार आहे. परिषदेच्या सभागृहामध्ये दुपारी चार वाजता होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय होणार आहे.
बेळगाव येथील मराठी बांधव प्रतिकूल परिस्थितीमध्ये मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करीत आहेत. बेळगावला महाराष्ट्र परिषदेची शाखा असावी अशी तेथील मराठीप्रेमी जनतेची मागणी आहे. त्याची दखल घेत २००० मध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. य. दि. फडके यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे साहित्य संमेलन घेण्यात आले होते. तेव्हापासून साहित्य परिषदेची शाखा सुरू करावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. येळ्ळूर येथील मैलाचे अंतर दर्शविणाऱ्या दगडावरील मराठी अक्षरे कन्नड सरकारने पुसून टाकली होती. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रामध्येही उमटले. या पाश्र्वभूमीवर बेळगाव येथे शाखा सुरू करण्याच्या प्रस्तावाला परिषदेच्या कार्यकारिणीने यापूर्वीच मान्यता दिली होती. आता डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचीही मान्यता घेण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने या शाखेला संलग्नत्व देण्यासाठी परिषदेच्या घटनेमध्ये दुरुस्ती करून कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्यासंबंधी सभेची मान्यता घेण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.
‘साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे त्रमासिक मुखपत्र संकेतस्थळावर नेण्यासंबंधीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीची माहिती देण्यात येणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले.