पिंपरी: स्वत:च्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तीन तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर घडली. तीनही मयत तरूण हिंजवडी व मारूंजी परिसरातील आहेत. या दुर्घटनेमुळे हिंजवडीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

दीपक सुभाष बुचडे (वय-२९, रा. मारूंजी), आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय-२८, रा. हिंजवडी), आशुतोष संतोष माने (वय-२३, रा. हिंजवडी) अशी मयत तरूणांची नावे आहेत. यापैकी दीपकचा येत्या १८ जूनला विवाह होणार होता. त्यासाठी देवदर्शन करून देवासमोर पत्रिका ठेवण्यासाठी हे तिघे बुधवारी सकाळी मोटारीने तिकडे गेले होते. तुळजापूर, गाणगापूर व अक्कलकोटला जाण्याचे त्यांचे नियोजन होते. तुळजापूरच्या मंदिरात पत्रिका ठेवल्यानंतर ते पुढे गाणगापूरला निघाले होते. रात्री नऊच्या सुमारास दीपकने तसे घरी फोन करून सांगितले होते. दुर्देवाने रात्री साडेअकराच्या सुमारास काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची मोटार व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला व त्यातच तिघांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांनी तिघांच्या कुटुंबियांना कळवली. या घटनेची वार्ता हिंजवडी, मारूंजी परिसरात पसरली. तेव्हा दोन्ही गावांसह पंचक्रोशीत शोककळा पसरली. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.