पत्रकार संघाकडून मारहाणीचा निषेध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मांजरी येथील शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारात सुरू असलेल्या आंदोलनाच्या वार्ताकनासाठी गेलेले ‘लोकसत्ता’चे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना मारहाण करणारे सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांची सोमवारी सायंकाळी बदलीचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले. वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तपदावरून मोरे यांना हटविण्यात आले असून त्यांची रवानगी पोलीस आयुक्तालयात असलेल्या विशेष शाखेत करण्यात आली आहे. वानवडी विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, सहायक आयुक्त मोरे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून सोमवारी करण्यात आली होती. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन दिले होते. विविध वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांचे पत्रकार यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मांजरी येथील शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारात वार्ताकनासाठी गेलेले ‘लोकसत्ता’चे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना शनिवारी (१६ डिसेंबर) वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्याकडून मारहाण करण्यात आली. सहायक आयुक्त मोरे यांच्या मुजोरीचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर या घटनेचा विविध स्तरांतून निषेध करण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून मारहाणीचा निषेध करून मोरे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध वृत्तपत्रांमधील पत्रकारांनी सोमवारी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे, उपाध्यक्ष हेमंत जाधव, चिटणीस सुकृत मोकाशी, कार्यकारिणी सदस्य अमोल येलमार, नितीन पाटील, प्रशांत आहेर, लक्ष्मण मोरे, रोहित आठवले, वैभव सोनावणे यावेळी उपस्थित होते.

पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष काळे यांनी पोलीस आयुक्त शुक्ला यांना निवेदन दिले. पुण्यासारख्या शहरात पत्रकारांना पोलिसांकडून मारहाण होण्याची घटना निंदनीय आहे. वार्ताकन करताना पत्रकारांना मारहाण करणे योग्य नाही. सहायक आयुक्त मोरे यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यात येत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी शुक्ला यांच्याशी बोलताना केली.

शुक्ला म्हणाल्या की, सहायक आयुक्त मोरे यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. परिमंडल चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांच्यामार्फत ही चौकशी सुरू असून लवकरच या प्रकरणाचा अहवाल मला मिळेल. त्यानंतर हा अहवाल पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येईल. पत्रकारांना मारहाण करणे योग्य नाही. या प्रकरणी सहायक आयुक्त मोरे यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. दरम्यान, पोलीस आयुक्त शुक्ला यांनी सहायक आयुक्त मोरे यांची वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तपदावरून बदली केली. त्यांची नेमणूक विशेष शाखेत (स्पेशल बँ्रच) करण्यात आली आहे. मोरे यांच्या जागी वानवडी विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

‘लोकसत्ता’च्या वार्ताहराला मारहाणीचे प्रकरण विधान परिषदेत

शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्ताकन करण्यासाठी गेलेले ‘लोकसत्ता’चे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण सोमवारी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित करण्यात आले. शिवसेनेच्या उपनेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मुजोरपणे वर्तन करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात सुरू असलेले आंदोलनाचे वार्ताकन करण्यासाठी लोकसत्ताचे वार्ताहर ज्ञानेश भुकेले गेले होते. त्यावेळी शासकीय अधिकारी प्रसाद आयुष यांनी मध्यस्ती केल्यानंतर आंदोलनाशी संबंधित काही प्रश्न भुकेले यांनी प्रसाद आयुष यांना विचारले. त्याचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिग करत असताना वानवडी विभागाचे सहायक आयुक्त मोरे यांनी भुकेले यांना धमकाविले, दमबाजी करून भुकेले यांना मारहाणही केली होती. तसेच गुन्हा दाखल करण्याची भीतीही दाखविली होती. या प्रकारानंतर गोऱ्हे यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना निवेदन दिले होते. त्यानंतर विधान परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून कारवाईची मागणी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही त्यांच्या या मागणीला समर्थन दिल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acp nilesh more transfer due to fight against loksatta reporter
First published on: 19-12-2017 at 03:52 IST