पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकारांची मालिका सुरूच असून, आता मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. रुग्णालयाच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यासह १६ कर्मचाऱ्यांनी ४ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने चौकशी केली होती. या चौकशी अहवालाच्या आधारे रुग्णालय प्रशासनाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

ससून रुग्णालयातील तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने हा या प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यासह एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ससून रुग्णालयातील रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, कक्षसेवक नीलेश शिंदे, अधिपरिचारिका सुमन वालकोळी, अधिपरिचारिका अर्चना अलोटकर, अधिपरिचारिका मंजूषा जगताप, वरिष्ठ लिपिक संतोष जोगदंड, कनिष्ठ लिपिक श्रीकांत श्रेष्ठ, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक संदीप खरात, अधिपरिचारिका नंदिनी चांदेकर, अधिपरिचारिका सरिता लोहारे, सेवानिवृत्त सीटी स्कॅन तंत्रज्ञ उत्तम जाधव, सेवानिवृत्त आया सुनंदा भोसले यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द केल्याने बुद्धिवंतांमध्ये नाराजी

या गुन्ह्यात ससून रुग्णालयातून बदली होऊन बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात सध्या कार्यरत असलेला वरिष्ठ लिपिक सचिन ससार, वरिष्ठ लिपिक पूजा गराडे, वरिष्ठ लिपिक दीपक वालकोळी, वरिष्ठ लिपिक दयाराम कछोटिया यांचाही समावेश आहे. तसेच, सरिता शिर्के, संदेश पोटफोडे, अभिषेक भोसले, भारती काळे, अनिता शिंदे, सरिता अहिरे, शेखर कोलार, राखी शहा या खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे नेमके कसे खाल्ले ?

ससूनच्या प्रशासकीय अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार अनिल माने याच्याकडे असताना, जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत हा गैरव्यवहार झाला. या काळात प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बँक खात्यातील व्यवहाराचे अधिकार माने याच्याकडे होते. या खात्यातील ४ कोटी १८ लाख रुपये त्याने रुग्णालयातील १६ कर्मचारी आणि ८ खासगी व्यक्तींच्या खात्यावर वेळोवेळी जमा केले. नंतर या कर्मचाऱ्यांनी हे पैसे एकाच कर्मचाऱ्याच्या खात्यावर पुन्हा जमा केले. या बदल्यात सर्व कर्मचाऱ्यांना ठरावीक रक्कम देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>>विसर्जन मिरवणुकीसाठी १३ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था

गैरव्यवहाराचा घटनाक्रम

– कालावधी : जुलै २०२३ ते जानेवारी २०२४

– उघडकीस कधी : जुलै २०२४

– समिती स्थापना : ऑगस्ट २०२४

– समितीकडून चौकशी : ऑगस्ट २०२४

– कारवाई : सप्टेंबर २०२४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठांचा वरदहस्त होता का?

ससूनमधील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचा वरदहस्त असल्याशिवाय एवढा मोठा गैरव्यवहार होणे शक्य नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या गैरव्यवहाराच्या कालावधीत अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर आणि डॉ. विनायक काळे हे होते. त्यामुळे त्यांच्याकडेही संशयाची सुई वळली आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी या प्रकरणी वरिष्ठांचा सहभाग तपासावा, अशी मागणी ससूनमधून होत आहे.

ससूनमधील सरकारी रकमेचा अपहार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे पोलिसांकडे कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बँक खात्याचे लेखापरीक्षण सुरू आहे.- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय