शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केलं. याविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे. आता कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी भिडेंवर कोणत्या कलमांनुसार कारवाई होऊ शकते हे सांगत प्रतिक्रिया दिली.

असीम सरोदे म्हणाले, “मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि त्यांचे चेलेचपाटे हे सातत्याने भारतातील काही महापुरुषांबद्दल गरळ ओकत असतात. खरं तर हे महापुरुष देशातच नाही तर जगात त्यांच्या महान कामासाठी ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सगळेजण परदेशात जाऊनही महात्मा गांधींच्या पुतळ्याला वंदन करतात, नतमस्तक होतात आणि पाया पडतात.”

“मनोहर भिडेंचं गांधीजींबद्दलचं वक्तव्य अत्यंत वाईट”

“अशा महात्मा गांधींबद्दल मनोहर भिडेंनी नुकतंच जे वक्तव्य केलं ते अत्यंत वाईट, दुःखद आणि चुकीचं आहे. भारतात महात्मा गांधींना मानणारी मोठी लोकसंख्या आहे. जे नागरिक लोकशाही मानतात, संविधान मानतात असेच लोक महात्मा गांधींनाही मानतात. अशा सर्व नागरिकांच्या वर्गाला दुखावण्याचं काम मनोहर भिडेंनी या वक्तव्यातून केलं आहे,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं.

कलमं सांगत असीम सरोदेंची भिडेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी

असीम सरोदे पुढे म्हणाले, “त्यामुळे पोलिसांनी खरं तर इतरांच्या भावना दुखावण्यासाठी कलम १५३ अ, अशाप्रकारची वक्तव्ये करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल कलम १०७ आणि एकत्रितपणे हे गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करणे, त्याच्या व्हिडीओ क्लिप प्रसारित करणे, ऑडिओ क्लीप प्रसारित करणे यासाठी कलम ३४ नुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला पाहिजे. पोलीस गुन्हा नोंदवत नसतील, तर गांधींना मानणारे या विरोधात लढा देतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भिडेंकडून गांधींजींच्या घरातील स्त्रियांची बेअब्रु”

“हा देश महात्मा गांधींचा देश म्हणून जगात ओळखला जातो. महात्मा गांधींना अहिंसेचा पुरस्कर्ता म्हणून अनेकदा नोबेल पुरस्कार देण्यासाठी नामांकन करण्यात आलं. मात्र, मृत्यूनंतर नोबेल पुरस्कार देऊ शकत नाही म्हणून गांधींना नोबेल देण्यात आलं नाही. अशा महात्मा गांधींचा मुद्दाम अपमान करणाऱ्या, गांधींजींच्या घरातील स्त्रियांची बेअब्रु करणाऱ्या आणि त्यांच्या खानदानाबद्दल अत्यंत वाईट बोलणाऱ्या आणि भारताच्या राष्ट्रपित्याला वाईट संबोधणाऱ्या मनोहर भिडेंविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी असीम सरोदेंनी केली.