पुणे : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने मध्यरात्री हल्ला केला. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस दक्ष झाले असून, बुधवारी पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत फेरी (रूटमार्च) काढली. राष्ट्रीय संकट निवारण पथकातील (एनडीआरएफ) जवानांसह पोलिसांनी संकटकालीन परिस्थितीला कसे सामाेरे जायचे, याची प्रात्यक्षिके गर्दीच्या भागांत सादर केली.
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या सूचनेनुसार पुण्यातील विधान भवन, मुळशीतील पंचायत समिती, तसेच तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या कार्यालयात माॅक ड्रिल करण्यात आले. युद्धजन्य परिस्थितीला सामोरे कसे जायचे, याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. माॅक ड्रिलमध्ये जिल्हा प्रशासन, महसूल, अग्निशमन दल, पोलीस, तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून फेरी काढली. गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक, तसेच माॅल, चित्रपटगृहांच्या परिसरात पोलिसांनी आपत्कलिन परिस्थितीला सामाेरे कसे जायचे, याची प्रात्यक्षिके सादर केली. एनडीआरएफचे जवान प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सहभागी झाले होते. संभाव्य अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर त्वरित पोलिसांशी संपर्क साधवा, तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
जगदाळे, गनबोटे यांच्या निवासस्थानी बंदोबस्त
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.