पुणे: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळे खासगी प्रवासी वाहतूक सेवेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांची सुरक्षाच वाऱ्यावर सोडली जात असल्याचे प्रकार वारंवार खासगी बसमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत ३० ते ४० टक्के घट झाली असून, व्यवसायाला फटका बसला आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी, तसेच प्रादेशिक वाहन विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन, बस अँड कार ओनर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीओसीआय) आणि पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन या खासगी बसमालक संघटनांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, उद्योजक व ‘बीओसीआय’चे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, किरण देसाई, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर, प्रकाश गवळी, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-पिंपरी: पाणीपट्टीची आता करसंकलन विभागाकडून वसुली

राज्यभरातून सुमारे दोनशे बसमालक या बैठकीत सहभागी झाले होते. या वेळी काही बसमालकांनी समृद्धी मार्गावरील अपघातानंतर स्लीपर कोच बसच्या व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे सांगितले. पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष किरण देसाई म्हणाले, की समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर खासगी बसच्या प्रवासी संख्येत ३० ते ४० टक्के घट झाली आहे. सध्या असलेल्या खासगी बसमध्ये स्लीपर बस कोचचे प्रमाण ९० टक्के आहे. स्लीपर कोच बस आणि समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या बसच्या प्रवासी संख्येत सर्वाधिक घट झाली आहे. यामुळे व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

अपघात टाळण्यासाठी त्रिसूत्री

अपघात टाळण्यासाठी वेगमर्यादा, नशामुक्त व तंदुरुस्त चालक, नियमांचे काटेकोर पालन या त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सर्व खासगी बस मालकांकडून या संदर्भात प्रतिबंधात्मक काळजी व उपाययोजना राबविण्याचा निर्धार करण्यात आला. प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी, तसेच विश्वासार्हता वाढविण्यासाठी नेटाने प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

आणखी वाचा-सावधान! कृत्रिम स्वीटनर ठरतोय आरोग्यासाठी घातक

चालक मद्यप्राशन करून बस चालवताना आढळल्यास दुसरा चालक उपलब्ध होईपर्यंत गाडी सोडण्यात येणार नाही. मद्यप्राशन केलेल्या चालकावर खटला दाखल करण्यात येईल. त्यानंतर त्याचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. -संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी