पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचावे, तरुणांना कृषी क्षेत्रात करिअरची संधी मिळण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार राज्यातील चार कृषी विद्यापीठांत प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण १२ ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रीकल्चर’ (सिडसा) सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहा, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सहा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कार्यालय येथे कृषी विद्यापीठांतर्गत ‘सिडसा’ केंद्र स्थापनेसंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल, उपसचिव प्रतिभा पाटील, श्रीकांत आंडगे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख या वेळी उपस्थित होते.

विद्यापीठांच्या माध्यमातून तयार होणारे नवे प्रयोग थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी क्षेत्रातील उत्पादकता, कार्यक्षमता आणि नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. या केंद्रांच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही गतीने पूर्ण करावी, प्रत्येक केंद्र ‘शेतकऱ्याच्या शेतात संशोधन’ या तत्त्वावर काम करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

भरणे म्हणाले, ‘सिडसा’ केंद्र स्थापनेसाठी कृषी विभाग आणि आय व्हॅल्यू संस्थेमध्ये करार करण्यात येणार आहे. राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान विकास अधिक परिणामकारकपणे राबविण्यात येईल. त्यामुळे कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रसार गतिमान होणार आहे. तसेच महाराष्ट्र स्मार्ट शेती, कृषी नवकल्पनांचा राष्ट्रीय केंद्रबिंदू होईल. ग्रामीण युवांसाठी कृषी तंत्रज्ञान नवउद्यमी, नवोपक्रम परिसंस्था विकसित होईल.

काय आहे ‘सिडसा’ची संकल्पना?

‘सिडसा’ संकल्पनँतर्गत कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान, संशोधन, विदा विश्लेषण, स्मार्ट शेती उपाय विकसित करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, कृषी शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे, शेतीतील समस्यांवर तंत्रज्ञान आधारित उपाय शोधणे, राज्यातील कृषी डेटा बँक आणि स्मार्ट शेती प्रारूपे विकसित करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी या केंद्रात कृषी यांत्रिकीकरण प्रयोगशाळा, स्मार्ट प्रीसिजन ॲग्रीकल्चर लॅब, ऑग्मेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी प्रयोगशाळा, कृषी उपकरणे नवोपक्रम प्रयोगशाळा, प्रगत ड्रोन तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या प्रयोगशाळा, आयओटी, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग, विदा विश्लेषण अशा तंत्रज्ञानाचा उपयोग करून करून स्मार्ट शेतीवर भर देण्यात येणार आहे. या केंद्रांना कृषी विद्यापीठे, उद्योग, नवउद्यमी, शेतकरी यांच्यात समन्वयाचे व्यासपीठ म्हणून विकसित करण्यावर भर आहे.