पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे ६६ लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई दिली जाईल,’ असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. संकटकाळात शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी आहे, असेही भरणे यांनी सांगितले.
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एन. चिनप्पन, द डेक्कन शुगर टेकनोलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर यावेळी उपस्थित होते.
‘देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, कामगारांना वेळेत वेतन, बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य येईल,’ असे भरणे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘साखर व्यवसायात काम करीत असताना विविध अडअडचणी येत असतात. या अडचणीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजे. या क्षेत्राच्या प्रगतीकरिता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. नवीन वाण विकसित आणि त्या माध्यमातून अधिकाधिक ऊस उत्पादन तसेच साखरेचा उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यादृष्टीने असोसिएशनने मार्गदर्शन केले पाहिजे.’
‘राज्यातील साखर हा मोठा उद्योग आहे. देशाच्या प्रगतीत साखर उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक क्रांती झाली आहे. साखर कारखान्यांनी एफआरपी आणि एमएसपी यांचा मेळ घालून व्यवसाय करावा. संचालक मंडळाने निर्णय घेतांना कारखान्याची आर्थिक परिस्थिती, उत्पादन, कामगाराचे वेतन, मुकादम, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, उसदर आदी घटक विचारात घेऊन निर्णय घ्यावेत.’ असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. अनास्कर म्हणाले, ‘साखर कारखान्यासाठी आर्थिक नियोजन महत्वपूर्ण असल्याने कारखान्यांनी व्यावसायिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, याबाबत असोसिएशनने तांत्रिक बाबीसोबतच आर्थिक नियोजनाबाबतही आगामी काळात मार्गदर्शन केले पाहिजे, यासाठी सहकारी बँकेच्यावतीने सहकार्य करण्यात येईल.