पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन डिसेंबरपासून पुणे ते अबू धाबी ही विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीने शनिवारी या हवाई मार्गाबाबत शनिवारी घोषणा केली. पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे ते अबू धाबी विमान उड्डाण होणार आहे. पुण्यातून रात्री ८.५० वाजता विमानाचे उड्डाण होईल आणि अबू धाबी येथे रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात, विमान रात्री ११.४५ वाजता अबू धाबीहून निघेल आणि पहाटे ४.१५ वाजता पुण्यात उतरेल, असे एअर इंडियाने एक्सप्रेस कंपनीने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

सध्या पुणे विमानतळावरून दुबई, बँकाॅक आणि सिंगापूर या तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणी नियमित उड्डाणसेवा सुरू आहे. हवाई प्रवाशांची युरोप, यूएई यांसारख्या देशांमध्ये विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. उद्योजकांकडून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचा विस्तार करण्यासाठी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण सुरू आहे. टप्प्याटप्प्याने विमानांची उड्डाणे वाढविण्यात येत आहेत. त्यानुसार एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने सिंगापूर, बँकाॅक हवाई सेवेनंतर आता अबू धाबी येथे विमानसेवेची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

‘आतापर्यंत पुणे ते अबू धाबी विमानसेवा नसल्याने प्रवाशांना मुंबई, दिल्ली या विमानतळांवरून जावे लागत होते. आता थेट सेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. त्याचबरोबर या सेवेमुळे पर्यटनाला चालना मिळेल. पुणे-सिंगापूर विमानसेवेमुळे पूर्वेकडील देशांशी पुण्याचे संबंध मजबूत झाले आहेत. तसेच पुणे – अबू धाबी सेवेमुळे पश्चिम देशांचा संपर्क सुलभ होईल,’ डाॅ. सुधीर मेहता, उद्योजक पुणे ते अबू धाबी विमानसेवेमुळे मध्य पूर्वेतून आणि युरोपकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. विमानतळ प्रशासनावरील जबाबदारी आणखी वाढली असून, त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. प्रवाशांना सुलभ प्रवासाची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

पुणे विमानतळावरून सुरू असलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा

क्षेत्र – हवाई कंपनी – वारंवारिता

दुबई – इंडिगो, स्पाईसजेट – दररोज

बँकाॅक – एअर इंडिया, इंडिगो – बुधवार, शुक्रवार, रविवार

सिंगापूर – विस्तारा, एअर इंडिया – आठवड्यातून चार – पाच दिवस