पिंपरी-चिंचवड शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या हवा शुद्धीकरण यंत्रणेची (एअर प्युरिफिकेशन) दुरवस्था झाली आहे. या यंत्रणेची तातडीने दुरुस्स्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत दिल्लीच्या धर्तीवर शहरातील दूषित हवा शुद्ध करण्यासाठी १७ प्रमुख चौकांमध्ये हवेतील प्रदूषण रोखणारी यंत्रणा उभारण्याची संकल्पना पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविली. या यंत्रणेद्वारे पाण्याचे तुषार हवेत फवारून हवेतील प्रदूषण कमी करण्याचा आणि त्याद्वारे नागरिकांना स्वच्छ व शुद्ध हवा मिळावी हा उद्देश होता. मात्र, या यंत्रणेची दुरवस्था झाली आहे. सध्या आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, चिंचवड, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पिंपरी), नाशिक फाटा चौक, कस्पटेवस्ती, होळकर चौक, वाकड-कोकणे चौक, तळवडे चौक आदी ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यातील बहुतांश ठिकाणी लोखंडी पाइप तुटलेले असून, ते लटकलेल्या अवस्थेत आहेत, तुटण्याच्या स्थितीत आहेत. यंत्रणेजवळून जाणाऱ्या वाहनचालक वा पादचाऱ्याच्या अंगावर किंवा वाहनावर पाइप पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘यंत्रणा शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी उभारण्यात आली असली, तरी त्यातील लोखंडी पाइप गंजून धोकादायक अवस्थेत आल्यामुळे ही संकल्पना अपूर्ण आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा धोका कमी करण्यासाठी अशा ठिकाणी तांत्रिक तपासणी करून तत्काळ दुरुस्ती करावी आणि यंत्रणा सुरक्षित करावी,’ अशी मागणी माधव पाटील यांनी केली.

हवा शुद्धीकरण यंत्रणा काय करते?

शहरातील विविध भागांत गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे प्रदूषण पातळीत वाढ होते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली. ही यंत्रणा बाहेरील अशुद्ध हवा खेचून घेते, ती हवा शुद्ध करून बाहेर सोडते. त्यामुळे शहरातील प्रदूषणात घट होत असल्याचा महापालिकेच्या पर्यावरण विभागाचा दावा आहे.

हवा शुद्ध करणाऱ्या यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती लवकरात लवकर करावी. ही यंत्रणा सक्षम व नियमित कार्यान्वित करावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय अतिशय गंभीर असल्याने त्वरित कार्यवाही करावी. वेळेत दुरुस्त झाली नाही तर अपघात होऊ शकतो.- दीपक खैरनार, निगडी

आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात हवा शुद्ध करण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणा नादुरुस्त झाली आहे. त्यातील एक पाइप तुटला असून, कधीही खाली पडून दुखापत होऊ शकते. महापालिकेने तातडीने दुरुस्ती करून घ्यावी.- काशिनाथ नखाते, चिंचवड

हवा शुद्ध करणाऱ्या यंत्रणेचे गंजलेले पाइप बदलले जातील. ज्या चौकातील पाइप तुटलेले आहेत, त्यांची दुरुस्ती करण्यात येईल.- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

पावसाळ्यामुळे हवा शुद्धीकरण यंत्रणा बंद ठेवली आहे. पाऊस थांबल्यावर धूळ वाढली, की यंत्रणा सुरू केली जाईल. यंत्रणा कार्यान्वित करण्यापूर्वी तिची दुरुस्ती केली जाईल.सोहम निकम,कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका