शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांची तक्रार केली. “माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होऊनही विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला नाही,” अशी तक्रार सुषमा अंधारेंनी केली. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुषमा अंधारे यांच्या तक्रारीला प्रत्युत्तर दिलं आहे. ते शुक्रवारी (१२ मे) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत? त्या शिवसेना-ठाकरे गटात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे आहेत. मग सुषमा अंधारेंनी अजित पवारचा उल्लेख करण्यापेक्षा, तिथं शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा, भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघतात, ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत आणि सभा घेत आहेत त्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याला सांगितलं पाहिजे.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : …आणि सुषमा अंधारे शरद पवारांसमोरच ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, “माझं चुकत असेल तर…”

“शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडला असता, तर…”

“जेवढा अधिकार विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याला आहे, तेवढाच अधिकार विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला आहे. माध्यमांनी त्यांना हे सांगावं की, तिथं शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडला असता आणि अंबादास दानवेंना तो मुद्दा उपस्थित करायला सांगितलं असतं तर जास्त योग्य ठरलं असतं,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला”

दरम्यान, नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर अजित पवार म्हणाले, “प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं. मात्र, पुढे काय झालं? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. एक तर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही.”

हेही वाचा : जयंत पाटलांना लग्नाच्या वाढदिवशी ईडीची नोटीस, अजित पवार म्हणाले, “माझा आणि त्यांचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकासआघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती. या घटना घडल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी पहिल्यांदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली. जर त्या जागेवर मविआचे नेते असते तर त्यांनी या १६ आमदारांना तेव्हाच अपात्र ठरवलं असतं,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.