इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवारही सुप्रिया सुळे यांच्या बाजूने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. त्यांच्याकडे इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पवार कुटुंबीयांतील बहुतांश सदस्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा या उमेदवार असणार आहेत. त्यामुळे नणंद-भावजय अशी ही लढत होणार असून पवार कुटुंबियांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. शरद पवार यांच्या सोबत पवार कुटुंबीयातील बहुतांश सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात उतरले होते. त्यानंतर आता अजित पवार यांचे धाकटे बंधू, उद्योगपती श्रीनिवास हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात उतरले आहेत.

हेही वाचा – माढ्यात मोहिते-पाटील शांत; मात्र समर्थक आक्रमक; ‘तुतारी’ वाजू लागली

श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुढील शनिवारी (२३ मार्च) इंदापूर येथे मेळावा होणार आहे. त्यादृष्टीने इंदापूर तालुक्यातील प्रचाराची जबाबदारी श्रीनिवास आणि शर्मिला पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. शर्मिला पवार यांनी शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या दुष्काळ भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. अल्पभूधारक, शेतकऱ्यांना व्यक्तिगत विहीर खोदाई, जमिन सपाटीकरणासाठी त्यांनी मदत केली आहे. सक्रिय राजकारणापासून काहीसे अलिप्त असले तरी, ते लोकसभेच्या निवडणूक प्रचारात सुळे यांच्या बाजूने उतरल्याने अजित पवार यांच्यापुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेले नाराजीनाट्य चार दिवसांत संपेल, गिरीश महाजन यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवार कुटुंबियातील बहुतांश सदस्य शरद पवार यांच्याबरोबर आहेत. बारामती येथील मेळाव्यात काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनीही ही बाब उघड केली होती. कुटुंबात मला एकटे पाडले जात आहे, असे विधान अजित पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आता श्रीनिवास आणि शर्मिला पवार यांनी भेटीगाठीही सुरू केल्या आहेत.