पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी बंडखोरी केल्यानंतर केलेल्या भाषणात स्वतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त करत राष्ट्रवादीने एकदा संधी असूनही गमावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा लागलेल्या बॅनरबाबत पत्रकारांनी अजित पवार यांनाच विचारणा केली असता त्यांनी त्यावर भाष्य केलं. ते रविवारी (१० सप्टेंबर) पुण्यात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “अलिकडे आपल्या महाराष्ट्रात एक नवीन फॅड निघालं आहे. अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असे बॅनर लावत असतात. माझ्या कानावर आलंय की, माझेही असे मुख्यमंत्रीपदाबाबत बॅनर लागले आहेत. राज्यात काही ठिकाणी राज ठाकरेंचे बॅनर लागलेत. काही ठिकाणी धनंजय मुंडेंच्या बहीण पंकजा मुंडेंचेही बॅनर लागले.”




“हे काही आम्ही कुणी सांगत नाही”
“कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. मागे मुंबईला राष्ट्रवादी भवनाच्या बाहेर माझे, जयंत पाटलांचे आणि सुप्रिया सुळे असे तिघांचे बॅनर लागले. हे काही आम्ही कुणी सांगत नाही. मी त्यांना नेहमी सांगतो की, असं कुणी बॅनरवर भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री लिहून सांगितल्याने तसं होत नाही. कुणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर १४५ आमदारांचा ‘जादुई आकडा’ गाठावा लागतो,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर…”; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
“१४५ आमदारांचा पाठिंबा मिळेल तो मुख्यमंत्री होतो”
“ज्या १४५ आमदारांचा पाठिंबा मिळेल तो मुख्यमंत्री होत असतो. मागे उद्धव ठाकरेंनी गाठला, देवेंद्र फडणवीसांनी गाठला आणि आत्ता एकनाथ शिंदेंनी हा आकडा गाठला आणि मुख्यमंत्री झाले”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.