लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : काही जण वाचाळवीर म्हणावे अशा पद्धतीने बोलत असून त्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. सत्ताधारी, विरोधक आणि इतर कोणीही भडक भाषणे करू नयेत, अशा शब्दांत कोणाचेही नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांचे कान टोचले.

पुणे दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘अंतरवाली सराटीमध्ये चार जणांना अटक झाल्याची पूर्ण माहिती माझ्याकडे नाही. कायदा सुव्यवस्था राखणे पोलीस आणि सरकारची जबाबदारी आहे. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र राष्ट्रीय, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होऊ नये, यासाठी कायदे नियम केले आहेत. निष्कारण कोणाला कोणत्याही प्रकरणात गोवणे हे सरकार सहन करणार नाही. सरकार म्हणून कायदा सुव्यवस्था राखावी लागते. न्यायालयाने घालून दिलेले नियम सर्वांनी पाळणे आवश्यक आहे. सत्ताधारी, विरोधक किंवा इतर कोणीही भडक भाषणे करू नयेत.’

आणखी वाचा-यापुढे सर्व सरकारी कार्यालये शासकीय जागेतच, अजित पवार यांची माहिती

दरम्यान, मागासवर्ग आयोगाने ४०० कोटी रुपये सरकारकडे मागितल्याची बातमी मी वाचली. मंगळवारी मुंबईत गेल्यानंतर याबाबत माहिती घेऊ. आयोगाला स्वायत्तता दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात चर्चा करून राज्याच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता पाहून आगामी निवडणुकांत उमेदवारीची निर्णय घेतला जाईल. सध्या चार राज्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून त्या झाल्यानंतर लोकसभेच्या जागांबाबत चर्चा करू, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक लवकरच पुण्यातील यशदा येथे घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची वेळ मागितली आहे. ३१ जुलैपर्यंत पाण्याचे साठे सुरक्षित कसे ठेवता येतील, बाकी पाणी शेतीला देता येईल, त्याचा पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी चाऱ्याची कमतरता, पाणीटंचाई जाणवत आहे. राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंडलनिहाय १०२० मंडल दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर केली आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्यांत जी मदत दिली जाईल, ती मदत या मंडलांमध्ये दिली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-कोयनेच्या पाण्याचा वाद चिघळला : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोयनेचे पाणी वीजनिर्मितीऐवजी…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझा आजार राजकीय नव्हता

दिवाळीआधी मला डेंग्यू झाला होता. या आजारात माझे १५ दिवस गेले. या काळात वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांत हा राजकीय आजार असल्याच्या बातम्या आल्या. मी लेचापेचा माणूस नाही. गेली ३५ वर्षे माझी मते सडेतोडपणे मांडत आहे. मात्र, दुर्दैवाने अशा बातम्या आल्या. मी मध्यंतरी गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो, तेव्हाही तक्रार करण्यासाठी गेलो, अशा बातम्या आल्या. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही, अशा शब्दांत पवारांनी आपला त्रागा व्यक्त केला.