scorecardresearch

सगळेच पैसे घेऊन कोणी वर जाणार नाही, काळाचं आणि नियतीचं बोलावणं… : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना थेट इशारा दिला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना थेट इशारा दिला आहे. कारखानदारांनी प्रत्येक गळित हंगामात साखर कामगारांचा कल्याण निधी म्हणून प्रतिटन १० रुपये न दिल्यास पुढच्या वर्षी तिथं कोयता पडणार नाही, अशी भूमिका घ्या,” असा सल्ला त्यांनी कामगारांना दिला. तसेच सगळेच पैसे घेऊन कोणी वर जाणार नाही, असं म्हणत त्यांनी कारखानदारांना टोला लगावला. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. यावेळी अजित पवार बोलत होते. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आजी माजी आमदारही कार्यक्रमाला उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, “काही जण मला म्हणाले की, आहो अजित पवार त्यांना १० रुपये द्यायला सांगत आहात, तर आम्ही का १० रुपये द्यायचे, असे काही साखर कारखान्याचे नेते, चेअरमन, मालक लोक म्हणाले आहेत. मी आजच्या आपल्या महामंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमा निमित्ताने सांगू इच्छितो की, जर कुठल्या साखर कारखान्यांनी गळिताच्या झालेल्या १० रुपये प्रमाणे पैसे दिले नाही, तर पुढच्या वर्षी तिथं कोयता पडणार नाही अशी भूमिका घ्या. मी मी म्हणणारे, अजित पवार पण गप बसून पैसे देईल. कोणी काही बडबड करणार नाही. हे सरळ सांगून ऐकत नसतील, तर बोट वाकडं करूनच लोणी काढावे लागते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“सगळेच पैसे घेऊन कोणी वर जाणार नाही”

“काही लोक म्हणाले यावर्षी देऊ पुढच्या वर्षी पाहू. आरे त्यांच्या जिवावर तुमचे साखर कारखाने चालतात. २८००, ३००० रुपये भाव देता, टनाला १० रुपये द्यायला त्या गोरगरिबांना द्यायला काय झाले? सगळेच पैसे घेऊन काही कोणी वर जाणार नाही. काळाचं आणि नियतीचं बोलावणं आलं की, असेच जावे लागते,” असे अजित पवार म्हणताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

“ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी चांगले शिक्षण मिळावे”

अजित पवार पुढे म्हणाले, “राज्यातील अनेक भागात जवळपास ९ ते १० लाख ऊस तोड कामगार काम करीत आहेत. त्यांच्या मुलांसाठी चांगले शिक्षण मिळावे. यासाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. या करिता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या कामगारांची मुले देखील चांगले शिक्षण घेऊन अधिकारी आणि विविध क्षेत्रात काम करावे, हा मागील हेतू आहे.”

“तसेच मागील २० वर्षांपासून महामंडळाबाबत चर्चा झाल्या, पण आज ते महामंडळ उभे राहिले आहे. त्याचा विशेष आनंद असून याचा लाभ राज्यातील ऊस तोड कामगार घेईल,” असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : “गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदारांना संधी मिळाली, पण त्यांच्याकडून…”, धनंजय मुंडे यांचा नाव न घेता पंकजा मुंडे यांना टोला

“साखर कारखान्यानी टनांला १० रुपये दिले. तेवढेच १० रुपये राज्य सरकार देईल. मी आता एवढ्यात शेखर गायकवाड यांना विचारत होतो, की यंदा किती पैसे जमा होतील, तर अंदाजे ११० कोटी रुपये साखर कारखान्यांकडून जमा होतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अर्थमंत्री या नात्याने सांगतो की, महाविकास आघाडी सरकार मार्फत त्यामध्ये ११० कोटी जमा केले जातील. त्यामुळे साधारणपणे यंदाच्या वर्षी २२० कोटींचा फंड जमा होईल. तसेच बांधकाम कामगार महामंडळ खूप मोठं आहे. त्यामध्ये काही हजार कोटी रुपये जमा झाले असल्याचे त्यांनी सांगितले,” असंही पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar criticize sugar factory owner on worker welfare fund in pune svk 88 pbs

ताज्या बातम्या