पिंपरी पालिकेत भाजपकडून गेल्या पाच वर्षात मनमानी कारभार सुरू होता. सत्ताधाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते की त्यांना योग्य मार्गदर्शन नव्हते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली उधळपट्टीबरोबरच बकालपणा सुरू आहे. रस्ते अरूंद करून पदपथ मोठे केले आहेत. त्यामुळे यापूर्वी नसलेल्या वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.

शहर राष्ट्रवादीच्या ‘निर्धार विजयाचा’ मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते. मेळाव्यात माधव पाटील, काशिनाथ जगताप, शुक्ला पठाण, ज्ञानेश्वर कांबळे, कविता खराडे, पल्लवी पांढरे, शिवाजी पाडुळे, विजय लोखंडे, प्रसन्ना डांगे, वर्षा जगताप, भाऊसाहेब भोईर, रविकांत वर्पे, अजित गव्हाणे यांनी मनोगते व्यक्त केली.

पवार म्हणाले, पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना शहराचा सर्वांगिण विकास सुरू होता. विरोधकांनी पक्षाची बदनामी केल्याने सत्ताबदल झाला. सत्तेत आलेल्या भाजप नेत्यांनी पाच वर्षांत पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले. चुकीच्या पद्धतीने पदपथ केले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.

गव्हाणे म्हणाले, भाजपच्या भ्रष्टाचारी कारभाराला जनता विटली आहे. तीनचा तथा चारचा प्रभाग झाला तरी यंदा पालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता येईल आणि महापौरही राष्ट्रवादीचाच होईल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक रणसुंभे यांनी केले. सूत्रसंचालन दिपक साकोरे यांनी केले.

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो राज्यस्तरावर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आघाडीचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले जातील. त्यामुळे आघाडीबाबत निर्णय घेताना सखोल अभ्यास करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या.

…तर कधीही निवडणुकांची शक्यता

प्रभागरचना बदलण्याच्या विरोधात काहीजण न्यायालयात गेले आहेत. त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केल्यास केव्हाही निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे कोणीही गहाळ राहू नका. निवडणुकीत राष्ट्रवादी कमी पडता कामा नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.