बारामती : ‘शहरात भटकी जनावरे, श्वानांचा वावर, तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेऊन नगर परिषदेने बंदोबस्त करावा. त्यासाठी शहरातील विविध भागांत कोंडवाड्याकरिता जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत,’ असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे दिले.

बारामती परिसरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, दशक्रिया घाट, शारदा प्रांगण येथील सुरू असलेली विविध विकासकामे, प्रस्तावित माळावरची देवी ते जळोची चौक चारपदरी रस्ता, जळोची कॅनॉल पुलावरून संभाजीनगरकडे जाणारा रस्ता, कॅनॉललगतची उद्यानाची जागा, जळोची ओढ्याशेजारील दशक्रिया घाट, दहनभूमी, दफनभूमी जागा, रुई हद्दीतील विद्या प्रतिष्ठानाशेजारील दोन लहान पूल, उद्यान, स्मशानभूमी, पूर संरक्षण भिंतीच्या प्रस्तावित जागेची अजित पवार यांनी पाहणी केली. विविध विकास कामांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले.

पवार म्हणाले, ‘बारामती परिसरातील हद्दवाढ लक्षात घेता प्रस्तावित जागेवर कामे सुरू करावीत. कामात अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. या परिसरातील रुई-जळोची ओढा रुंदीकरणाची कामे करताना मोजणी करून त्यामध्ये अतिक्रमण असल्यास ते काढावे. या ओढ्याच्या दोन्ही बाजूंस पूर संरक्षक भिंतीचे बांधकाम करावे.’

‘शारदा प्रांगण परिसरात उभारण्यात येणाऱ्या सीबीएसई आणि मराठी शाळेत विद्यार्थी व शिक्षकांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करून इमारत व परिसर विकसित करा. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचा विचार करून शौचालय, पाणी, विद्युतव्यवस्था ही कामे करावीत. बाबूजी नाईक वाडा, दशक्रिया घाट परिसरात सावली देणारी झाडे लावावीत.

दशक्रिया घाट परिसरामध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळतील, या दृष्टीने नियोजन करून कामे करावीत. पाणी साचणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. कविवर्य मोरोपंत यांच्या स्मारकाची आवश्यक ती डागडुजी करून घ्यावी,’ अशा सूचनाही पवार यांनी केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बारामती परिसरात विविध विकासकामे सुरू असून, आगामी काळात होणाऱ्या हद्दवाढीचा विचार करून पुढची शंभर वर्षे उपयोगात येईल, तसेच कामे करताना ती देखभालविरहित झाली पाहिजेत, या दृष्टीने नियोजन करून कामे करा,’ असे निर्देश पवार यांनी दिले.
आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमांतर्गत स्वच्छतेकरिता टार ग्लूटन लीट्टर पीकिंग मशिन देण्यात आल्या आहेत. पवार यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या सेवेत त्या दाखल करून घेण्यात आल्या.