पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी ठेवण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आयुक्तांनी स्थानिक ग्रामस्थांशी गुरुवारी चर्चा केली. आता यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर उद्या (शुक्रवारी) हे ग्रामस्थ बाजू मांडणार आहेत. यामुळे आयटी पार्कमधील रस्त्यांचा चेंडू पुन्हा एकदा अजित पवारांच्या कोर्टात गेला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात आयटी पार्कची पाहणी केली होती. त्या वेळी हिंजवडीच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी गावठाणाच्या हद्दीत प्रस्तावित रस्ता रुंदीकरण कमी करण्याची मागणी केली होती. त्यावर पवार यांनी कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर आयटी पार्क परिसरातील हिंजवडी आणि माण ग्रामपंचायतींनी त्यांच्या ग्रामसभेत प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला विरोध करणारे ठराव मंजूर केले. शासनाने ग्रामपंचायतींना विचारात न घेता रस्ता रुंदीकरण केल्यास तीव्र विरोध करण्याची भूमिका या ग्रामपंचायतींनी घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची भेट घेतली. त्या वेळी नवीन रस्त्यांची आखणी, त्यासाठी आवश्यक जमिनीच्या संपादन प्रक्रियेच्या अनुषंगाने आयुक्तांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवूनच निर्णय घेण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, त्यांचे हक्क आणि अधिकारांचा प्रथम विचार करून भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिली, तर त्यांना २५ टक्के अधिकचा मोबदला शासनाकडून मिळणार आहे. या प्रस्तावित नवीन रस्त्यांच्या आखणीमुळे हिंजवडीसह परिसरातील वाहतूककोंडी दूर होणार असून, नागरी समस्याही सुटणार आहेत.’

शेतकऱ्यांना टीडीआर

हिंजवडी, माण, मारुंजी भागातील प्रस्तावित रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान बाधित शेतकऱ्यांना विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) मोबदला स्वरूपात देणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यामध्ये पांडवनगर ते माण गावठाण ते हिंजवडी टप्पा ३ (टी जंक्शन), लक्ष्मी चौक ते पद्मभूषण चौक ते विप्रो सर्कल, मेझानाईन ते लक्ष्मी चौक, लक्ष्मी चौक ते मारुंजी, शिंदे वस्ती ते जगताप चौक (कासारसाई रस्ता), मधुबन हॉटेल (पुणे महापालिका हद्द) ते शिवाजी चौक या प्रस्तावित रस्त्यांचा यात समावेश असून, संबंधित शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.

स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत प्रस्तावित रस्त्यांची रुंदी कमी ठेवावी, अशी मागणी केली आहे. याबाबत राज्य शासनाच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी आढावा बैठक घेणार असून, त्या वेळी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडण्यात येईल. – डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

आयटी पार्कमध्ये गावठाणाच्या हद्दीत रस्त्यांची रुंदी कमी ठेवावी, अशी स्थानिक ग्रामपंचायतींची मागणी आहे. याबाबत आम्ही पीएमआरडीए आयुक्तांसमोर भूमिका मांडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरही आमच्या मागण्या शुक्रवारी मांडणार आहोत. – गणेश जांभूळकर, सरपंच, हिंजवडी