पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे आणि अजित पवार गटाचे नेते बंडू शहाजी खांदवे या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मागील आठवड्यात लोहगाव येथील एका कार्यक्रमादरम्यान हाणामारीची घटना घडली होती.
त्या घटनेवेळी बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबातील सदस्य किरण पठारे यांनी फिर्यादी बंडू शहाजी खांदवे यांच्या गळ्यातील सात तोळ्याची चेन चोरून नेल्याची तक्रार बंडू शहाजी खांदवे यांनी विमानतळ पोलिस ठाणे येथे नोंदवली. त्या तक्रारीनुसार धक्काबुक्की आणि जबरी चोरीप्रकरणी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह आठ जणां शविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार बापूसाहेब पठारे, महेंद्र पठारे, सुरेंद्र पठारे, रवींद्र पठारे, किरण पठारे, सागर पठारे, सचिन पठारे, रूपेश मोरे व शकील शेख या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सर्व घडामोडीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी बापूसाहेब पठारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले, ज्याची चूक असेल त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश मी पोलीस आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.