पुणे : ‘सध्याच्या तरुणांमध्ये वाचनाची आवड नाही, असे म्हटले जाते. मात्र, असे नसून पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचनाची आवड असल्याचा प्रत्यय आला आहे,’ असे उद्गार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी काढले. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’मार्फत बाणेर-बालेवाडी येथे उभारण्यात येणारे स्वतंत्र पुस्तकाचे ‘विश्वदालन’ वाचकांसाठी, पुस्तक प्रकाशकांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये पक्षीतज्ज्ञ आणि वृक्ष अभ्यासक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली लिखित साहित्य दालनाचे उद्घाटन रविवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार हेमंत रासने, ॲडव्हेंचर फाउंडेशनचे संस्थापक विवेक देशपांडे, अक्षरधाराचे संचालक रमेश राठिवडेकर यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दहा दिवसांत पुस्तक विक्रीतून ११ कोटींची उलाढाल झाली. वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने गेल्या वर्षी असाच उपक्रम राबविला आणि यामध्ये सुमारे ४० कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली. यामध्ये जवळपास चार लाख शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग होता. त्यामुळे तरुणांमध्ये वाचनाची आवड असल्याचे प्रकर्षाने जाणवते.’
वाचकांची आवड, मिळालेला प्रतिसाद, प्रकाशकांची धरपड पाहता राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडी येथे पुस्तकांचे विश्वदालन उभारण्यात येत आहे. चार ते साडेचार कोटी रुपयांची इमारत बांधण्यात येत असून, लवकरच हे दालन सर्वांसाठी खुले होईल. विशेषत: नवोदित लेखकाला पुस्तक प्रकाशन हा अत्यंत खर्चिक अडथळा असतो. हा अडथळा दूर होणार असून, या ठिकाणी मोफत प्रकाशन करता येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, ‘मी मूळचा कोल्हापूरचा असल्याने माझे तेथे स्वत:चे घर आहे. पुण्यातला मतदारसंघ असल्यामुळे येथेही घर आहे, तर मंत्री असल्यामुळे मुंबईतही घर आहे. तिन्ही घरात दोन कपाटे भरून पुस्तके आहेत. घरी कोणी स्नेही आले, तर पुस्तके वाचतात, घेऊन जातात. माझी स्वत:ची फिरती अभ्यासिका असून, आतापर्यंत सहा हजार वाचक जोडले गेले आहेत.’