scorecardresearch

दर्शकांसाठी कलाकृतीचा दर्जा, रंजनमूल्य महत्त्वाचे – सतीश आळेकर

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘सांस्कृतिक कट्टा’ उपक्रमाअंतर्गत आळेकर यांच्यासोबत मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

दर्शकांसाठी कलाकृतीचा दर्जा, रंजनमूल्य महत्त्वाचे – सतीश आळेकर
ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर

विचारसरणीने कलेची कास धरायची की नाही हा प्रश्न आजचा नाही. पूर्वीपासून विचारसरणीच्या प्रचारासाठी कलेचा वापर देशात-परदेशात होत आला आहे. पण, त्यासाठी कला ही प्रथम उत्तम कलाकृती असली पाहिजे. विचारसरणी ही कलाकृतीच्या सौंदर्यातून व्यक्त व्हावी. दर्शक विचारसरणीमुळे ती कलाकृती पाहतो असे नाही. ती कलाकृती कलात्मक आणि रंजक आहे की नाही हे सर्वमान्य दर्शकाला कळते. त्यामुळे दर्शकांसाठी विचारसरणीपेक्षा कलाकृतीचा दर्जा महत्त्वाचा ठरतो, असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- ‘प्रसार भारती बरखास्त करावे’; जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांची मागणी

नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत आळेकर यांच्यासोबत मुक्त संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या प्रसंगी आळेकर बोलत होते. संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, उपाध्यक्ष गणेश कोरे उपस्थित होते.

हेही वाचा- राज्यात लम्पीची साथ उतरणीला; गोवंशाचे सत्तर टक्के लसीकरण; पशूमालकांची भीती कमी

आळेकर म्हणाले, की कला ही प्रवाही असते. ती बदलत जाते. नाटक, संगीत मैफील यांचेदेखील तसेच असते. नाटक हा समाजाचा आरसा आहे. कालांतराने त्याचे सादरीकरण बदलते. १८८१ साली ‘संगीत शारदा’ या नाटकातून मुलीच्या लग्नाचे वय किती असावे, यावर चर्चा करण्यात आली. नंतरच्या काळात इतर सामाजिक प्रश्न नाटकाच्या माध्यमातून हाताळले जाऊ लागले. मात्र, काही कालावधीनंतर लेखक, निर्मात्यांना जे सांगायचे त्यासाठी संगीत नाटक पुरेसे नव्हते. त्यामुळे नवीन पर्याय शोधले गेले. नाट्यसंगीत संपले नाही, तर ते नाटकातून संगीत मैफिलीमध्ये आले.

हेही वाचा- अकरावी प्रवेशाची संधी मिळूनही विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रवेशाकडे पाठ

विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून समुपदेशन करणे हे शिक्षकाचे काम आहे. शिक्षण घेणाऱ्या मुलांसोबत केवळ विद्यार्थी म्हणून संबंध न ठेवता, त्यांची परिस्थितीदेखील समजून घेणे आवश्यक असते, असे सांगून आळेकर म्हणाले, की पूर्वी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र राहत असले तरी कोणीही आम्हाला ‘हीच विचारसरणी योग्य, आणि तुम्ही तिकडे जा’ असा आग्रह कोणी धरला नव्हता. त्या वेळी वातावरण अतिशय मोकळे होते. आता तो उदारमतवादीपणा कमी होत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या