पुणे प्रतिनिधी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर काल झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात माहीमच्या समुद्रात बांधण्यात आलेल्या मजारचा मुद्दा उपस्थित केला होता. ही मजार अनधिकृतरीत्या बांधण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला होता. ती मजार महिन्याभरात हटवली गेली नाही. तर त्याच्या शेजारी गणपतीचं मोठं मंदीर बांधण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.त्यानंतर आज सकाळीच पालिकेकडून या मजारवर कारवाई करण्यात आली आहे. त्या कारवाईनंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले असून भोंग्यासारखी भूमिका मध्येच राज ठाकरे यांनी सोडू नये. अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. आणखी वाचा- माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल! यावेळी आनंद दवे म्हणाले की,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या जाहीर सभेत अनेक मुद्यावर भाष्य केले. त्यामध्ये माहीम येथील समुद्रातील दर्ग्या बाबत जी भूमिका मांडली. त्याबाबत आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. पण भोंग्यासारखी भूमिका मध्येच राज ठाकरे यांनी सोडू नये. तसेच आज सकाळी माहीम येथील समुद्रातील दर्ग्याच्या आजूबाजूच्या परिसरावर कारवाई करण्यात आली आहे. तो दर्गा पूर्णपणे काढण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अखेरपर्यंत हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा पुन्हा आजूबाजूला बांधकाम होतील आणि पाहिल्यासारख सुरू होईल. अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली. तसेच ते पुढे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत माहीम येथील दर्ग्या बाबत जी भूमिका मांडली. त्या प्रमाणेच पुण्यातील शनिवारवाडा येथील जो दर्गा आहे आणि पुण्यश्वर मंदिर परिसरात ज्या मशिदीचे आक्रमण झाले आहे. या दोन्ही बाबत राज ठाकरे बोलतील असे वाटत होते. मात्र त्यांनी त्यावर काही भूमिका मांडली नाही. पण ते भविष्यामध्ये निश्चित भूमिका मांडतील अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.