भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल शिरोळे यांची सोमवारी पक्षाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिरोळे यांच्या निवडीमुळे पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे पारडे पुण्यात जड झाले असून शिरोळे यांनीही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जाहीर केले.
शहराध्यक्षपदी भाजतर्फे कोणाची निवड होणार याबाबत गेले दोन महिने चर्चा सुरू होती. अध्यक्षपदासाठी शिरोळे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक गणेश बीडकर यांच्यापैकी एकाची निवड होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार मुंडे गटाचे खंदे समर्थक शिरोळे यांना पुण्याचे अध्यक्षपद देण्यात आले असून त्यांच्या निवडीनंतर पक्षातील मुंडे समर्थक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयात पेढे वाटून आनंद साजरा केला. पक्षाचे प्रदेश चिटणीस योगेश गोगावले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
संयमी, तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते
स्वच्छ प्रतिमेचे, संयमी, अभ्यासू आणि तत्त्वाशी तडजोड न करणारे कार्यकर्ते अशी शिरोळे यांची ओळख असून यापूर्वी नगरसेवक म्हणून काम करताना शिरोळे यांनी वेळोवेळी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी सन १९९९ ते २००२ मध्ये काम पाहिले होते. महापालिकेच्या १९९२, ९७ आणि २००२ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ते निवडून गेले होते आणि २००७ मध्ये ते स्वीकृत नगरसेवक होते. महापालिकेकडून होणारे अवास्तव खर्च, तसेच नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी थांबावी, योग्य ठिकाणी योग्य खर्च व्हावा यासाठी शिरोळे सातत्याने प्रयत्नशील राहिले. मुख्य सभेचे कामकाज योग्यरीतीने चालण्यासाठीही त्यांनी प्रसंगी सर्वाच्या विरोधात जाऊन वेळोवेळी भूमिका मांडल्या होत्या.
लोकसभेसाठी इच्छुक- शिरोळे
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिरोळे यांचे पक्षकार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न मी करीन. लोकसभेची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला असता लोकसभेसाठी मी इच्छुक आहे, असे ते म्हणाले. गेली लोकसभा निवडणूकही लढवली होती; पण त्यावेळी तयारीसाठी वेळ कमी मिळाला होता. काही त्रुटी राहून गेल्या त्यामुळे पराभव झाला. या वेळी संधी मिळाल्यास योग्यप्रकारे तयारी करता येईल, असेही त्यांनी सांगितले. आमदार गिरीश बापटही इच्छुक असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पक्षात लोकशाही असल्यामुळे प्रत्येकालाच इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
पुण्यात भाजपच्या शहराध्यक्षपदी मुंडे गटाचे अनिल शिरोळे
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल शिरोळे यांची सोमवारी पक्षाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिरोळे यांनीही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जाहीर केले.
First published on: 11-06-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil shirole elected as city bjp president