पिंपरी, चिंचवड व भोसरी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटात सध्या तणावाचं असल्याचं बोललं जात आहे. येथील अजित पवार गटातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. अजित पवार गटातील काही नगरसेवकांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शरद पवार हे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला (पिंपरी-चिंचवड महापालिका) भगदाड पाडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशातच भोसरीचे आमदार विलास लांडे (अजित पवार गट) हे देखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आमदार विलास लांडे यांचे मित्र आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार अण्णा बनसोडे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की भोसरीचे आमदार आणि तुमचे मित्र विलास लांडे हे त्यांच्या काही सर्थकांसह शरद पवार गटातील नेत्यांना भेटले आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी या भागातील काही नगरसेवक शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचं दार ठोठावत असल्याचे दावे केले जात आहेत. अशा स्थितीत त्या गटाकडून (शरद पवार) कोणी तुमच्याशी संपर्क साधला आहे का? किंवा आमदार विलास लांडे यांच्याशी तुमचं सध्याच्या राजकीय स्थितीवर काही बोलणं झालं आहे का? यावर उत्तर देताना अण्णा बनसोडे म्हणाले, विलास लांडे हे माझे खूप चांगले सहकारी आहेत. आम्ही दोघांनी गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेचे सदस्य म्हणून एकत्र काम केलं आहे. आमचा दोघांचा दररोज संपर्क होतो. मात्र या गोष्टींबाबत आम्ही एकमेकांशी कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही.

दरम्यान, आमदार विलास लांडे शरद पवारांच्या गटात जातील का? असा प्रश्न विचारल्यानंतर अण्णा बनसोडे म्हणाले, काल-परवा मी वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्ये अशा आशयाच्या बातम्या पाहिल्या. विलास लांडे आणि आमच्या पक्षातील काही नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र माझ्या माहितीनुसार शरद पवारांना भेटल्यानंतर विलास लांडे यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली. अजित पवारांशी केलेल्या चर्चेनंतर विलास लांडे अजित पवार गटात थांबल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

हे ही वाचा >> “विधानसभेसाठी अनेकांकडून संपर्क, मात्र मी…”, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंचं ठरलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अधिकृत उमेदवारी दिल्याने नाराज झालेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच शरद पवार गटातील काही नेते भोसरी, पिंपरी, चिंचवडमधील अजित पवार गटातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना स्वगृही आणण्यासाठी त्यांच्या संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत.