पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) औद्योगिक कामगारांसाठी चाकण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वसाहतीत ‘पीएमपी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या आठवड्यापासून अंबेठाण चौक, स्पायसर चौक, स्कोडा कंपनी, एचपी चौक आणि पुन्हा अंबेठाण चौक या मार्गावर वर्तुळाकार पद्धतीने सहा ‘पीएमपी’ चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांचा प्रवास सुकर होणार आहे.
पुढच्या टप्प्यात भोसरी ‘एमआयडीसी’ परिसरातही असाच मार्ग सुरू करण्याचे प्रयोजन आहे. सध्या सर्वेक्षण सुरू असून, या मार्गांवरही पीएमपी सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.
पुणे शहराच्या उपनगर परिसरातील चाकण औद्योगिक क्षेत्र ६०७ एकर क्षेत्रावर विस्तारले आहे, तर भोसरी परिसरातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार ३,५०० एकराहून अधिक आहे. या औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे आठ हजार भूखंडधारक आणि जवळपास पाच हजार लघुउद्योग कार्यरत असून, हे उद्योग विविध मोठ्या उत्पादन कंपन्यांना सुटे भाग पुरवतात. महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादन केंद्रे येथे आहेत. परिणामी, या परिसरात दररोज लाखो कामगारांची ये-जा सुरू असते.
मात्र, सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सोयींमुळे कामगारांना खासगी वाहनांच्या, रिक्षांच्या अथवा ॲप-आधारित सेवांच्या पर्यायांवर अवलंबून राहावे लागते. विशेषतः रात्र पाळीतील कामाच्या वेळा संपल्यानंतर, बस अथवा रिक्षा उपलब्ध नसल्याने कामगारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
या पार्श्वभूमीवर, ‘पीएमपी’ प्रशासनाने चाकण औद्योगिक क्षेत्रात सहा वर्तुळाकार बसगाड्यांची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांमधील सकाळ, दुपार, रात्रपाळीनुसार गाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार अंबेठाण चौकापासून सुरू होऊन दोन्ही मार्गांवर ‘पीएमपी’ ये-जा करणार आहे. त्यासाठी महत्त्वाच्या चौकांवर थांबे प्रस्तावित करण्यात आले आहेत.
दैनंदिन लाखो कामगार या परिसरात प्रवास करतात. त्यांच्या सोयीसाठी या बससेवेची रचना करण्यात आली आहे. सेवेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास, आणखी ‘पीएमपी’ उपलब्ध करून देण्यात येतील.- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल