पुणे : एरंडवणे परिसरातील आणखी एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी समोर आले. त्यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या सहावर पोहोचली आहे. रुग्ण आढळून आलेल्या एरंडवणे आणि मुंढवा परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवती आणि तापरुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे.

एरंडवण्यातील गणेशनगर परिसरातील गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ती १६ आठवड्यांची गर्भवती आहे. तिच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नव्हती. महापालिकेकडून रुग्ण आढळलेल्या परिसरातील गर्भवतींची झिका तपासणी सुरू आहे. गर्भवतींचे रक्त नमुने घेऊन ते राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात येत आहेत. या गर्भवतीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधी याच भागातील एका गर्भवतीला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते.

शहरात एरंडवणे परिसरात ४ आणि मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात २ असे एकूण झिकाचे ६ रुग्ण आढळले आहेत. महापालिकेने या दोन्ही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. एरंडवण्यातील ७ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर डासोत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट केली जात आहेत, असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

झिकाचे जनुकीय क्रमनिर्धारण होणार

पुण्यात झिकाचा प्रार्दुभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सोमवारी बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि एनआयव्हीतील शास्त्रज्ञ उपस्थित होते. या बैठकीत झिकाच्या विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण एनआयव्हीने करावे, अशी सूचना मांडण्यात आली. यानुसार एनआयव्हीकडून झिकाचे जनुकीय क्रमनिर्धारण केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> विक्रमी प्रवासी संख्येसह मेट्रो सुसाट! पालख्यांच्या आगमनामुळे ३० जूनला दुपटीने वाढून दोन लाखांवर पोहोचली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्भवतींना जास्त धोका?

झिका विषाणूच्या संसर्गामुळे गर्भावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे मूल जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकते. हा संसर्ग मुदतपूर्व जन्म आणि इतर गुंतागुंतीसाठी कारणीभूत ठरतो. गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्यास मुलाचा डोक्याचा आकार कमी होतो. याला गुलियन बॅरी सिंड्रोम असे म्हटले जाते. हा एक दुर्मीळ मेंदुविकार असून, त्यात शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा मज्जासंस्थेच्या भागावर हल्ला करते. या आजाराचा धोका गर्भाला मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे झिकाचा प्रसार असलेल्या भागात गर्भवतींनी जाणे टाळावे, असा सल्ला दिला जातो. तसेच, झिकाचा संसर्ग झालेल्या महिलांना आठ आठवडे गर्भधारणा टाळण्यास सांगितले जाते.