पुणे : गुंड नीलेश घायवळ टोळीतील सराइतासह गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना खंडणीविरोधी पथकाने नऱ्हे परिसरातून अटक केली.मुसाब शेख (वय ३४, रा. नऱ्हे), तेजस डांगी (वय ३३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोथरूड भागात १७ सप्टेंबर रोजी दुचाकीला जाण्यास जागा न दिल्याने घायवळ टाेळीतील सराइतांना एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. त्यानंतर आरोपींनी याच भागात एका तरुणावर कोयत्याने वार करून दहशत माजविली होती. याप्रकरणी पोलिसांनी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक केली होती.
या प्रकरणातील पसार आरोपी मुसाब शेख हा नऱ्हे भागात वास्तव्यास असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील (दोनचे) पोलीस कर्मचारी अमोल घावटे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शेख याला पकडले.
तपासात तेजस डांगी हा गांजा तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे अतिरक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, अमोल राऊत, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, गणेश खरात यांनी ही कामगिरी केली.
घायवळचे साथीदार पसार
कोथरूड गोळीबार प्रकरणात नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आल्यानंतर घायवळ टोळीतील सराइत पसार झाले आहेत. आतापर्यंत घायवळ याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध ‘मकोका ’कारवाई करण्यात आली आहे.