पुणे : शहरातील एका खासगी रुग्णालयातून निलंबित करण्यात आलेल्या डाॅक्टर तरुणासह तिघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ४३ हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. यापूर्वी डाॅक्टरला अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर अमली पदार्थ विक्री प्रकरणात त्याला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. बिबवेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली.

मोहमद उर्फ आयान जारून शेख (वय २७, रा. उंड्री), सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (वय २८, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड), अनिकेत विठ्ठल कुडले (वय २७, रा. नारायण पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महंमद उर्फ आयान शेख हा मूळचा जम्मू काश्मीरमधील आहे. तो एमबीबीएस आहे. यापूर्वी तो एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होता. त्याला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्याला रुग्णालय प्रशासनाने सेवेतून निलंबित केले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अमली पदार्थ विक्रेते, तसेच तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत.

बिबवेवाडी भागात अमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी एका हाॅटेलसमोर महंमद ,सॅम्युएल आणि अनिकेत हे एका मोटारीत थांबले होते. त्यांच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना पकडले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, मोटार, मोबाइल संच असा १५ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के आदींनी ही कामगिरी केली. आरोपींनी मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच ते कोणाला विक्री करणार होते, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.