पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून आस्थापनेवर असलेले अभिजित बापट हे सातारा नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कामकाज करत आहेत. उपायुक्त असलेल्या बापट यांच्याकडे सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार शासनाने दिला आहे. त्यामुळे आस्थापना पिंपरीत आणि कामकाज साताऱ्यात करत असल्याचे समोर आले. दरम्यान, साताऱ्यातील भाजपा राज्यसभा खासदाराच्या आग्रहावरुन बापट यांना साताऱ्यात ठेवले असल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.
 
सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असलेले अभिजीत बापट यांना शासनाने १८ जून २०२१ रोजी मुख्याधिकारी ‘गट अ’ (एस २०) वरुन मुख्याधिकारी ‘गट अ’ (एस २३) म्हणून पदोन्नती दिली. बापट यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली. बापट यांना साताऱ्याच्या जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्तीच्या पदावर पिंपरीत रुजू होण्यासाठी १२ जुलै २०२१ रोजी कार्यमुक्त केले. त्यानुसार तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी अभिजीत बापट यांना १२ जुलै २०२१ रोजी महापालिकेच्या उपायुक्तपदी रुजू करुन घेतले. बापट हे रुजू होण्यासाठी एक दिवस महापालिकेत आले. त्यानंतर पालिकेत फिरकले नाहीत.

आणखी वाचा- पुण्यात जगणारे आणि मरणाऱ्यांनाही छळले, जन्म-मृत्यू नोंदणीचा खोळंबा!

राज्य शासनाने १५ जुलै २०२१ रोजी उपायुक्त असलेल्या बापट यांच्याकडे सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत सोपविला. याबाबतचा आदेश शासनाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी काढला. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दिला जात नाही. त्यामुळे बापट यांची पिंपरी महापालिकेत आस्थापना ठेवून त्यांच्याकडे सातारा नगरपरिषद मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगितले गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बापट यांच्याकडे मुख्याधिकारीपदाचा कार्यभार ठेवण्यासाठी भाजपचा एक खासदार आग्रही असल्याची चर्चा आहे. मागील पावणेदोन वर्षांपासून बापट यांची पिंपरी महापालिकेत आस्थापना आहे. मात्र, कामकाज ते साताऱ्यात करत आहेत. त्यांचे वेतन सातारा नगरपरिषदेकडूनच दिले जाते. पण, त्यासाठी पिंपरी महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले जाते.