लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: कोथरुड परिसरात संशयित दहशतवाद्यांना पकडणारे पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण, अमोल नाझण यांच्या जिगरबाज कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे.
कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण, अमोल नाझ मंगळवारी रात्री कोथरुड भागात गस्त घालत होते. त्या वेळी तिघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत होते. त्या वेळी पोलीस शिपाई चव्हाण, नाझण यांना संशय आल्याने आरोपी इम्रान खान, युनुस साकी यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला. त्यानंतर खान आणि साकी राहत असलेल्या घराची झडती घेण्यात आली. घरातून एक काडतूस, चार मोबाइल संच, लॅपटॉप जप्त करण्यात आला. चौकशीत खान, साकी आणि साथीदाराविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने राजस्थानात गुन्हा दाखल केला होता हे उघड झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. एनआयएने त्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
आणखी वाचा-पुणे: चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन; तिघे अटकेत
पोलीस शिपाई चव्हाण, नाझण यांनी संशयित दहशतवादी खान आणि साकी यांना पकडले तेव्हा त्यांनी खोटी नावे सांगितली होती. चव्हाण, नाझण यांनी दोघांचे मोबाइल क्रमांक विचारले. मोबाइल क्रमांकाची ॲपद्वारे पडताळणी करण्यात आली. तेव्हा आरोपींनी सांगितलेली नावे खोटी असल्याचे उघडकीस आले. चव्हाण आणि नाझण यांचा संशय बळावला. त्यांनी खान आणि साकी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर आरोपी राजस्थानातून पसार झाले असून, ते संशयित दहशतवादी असल्याचे उघडकीस आले. चव्हाण आणि नाझण यांनी त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली.
संशयित दहशतवाद्यांना पकडणारे चव्हाण आणि नाझण यांच्या कामगिरीचे कौतुक पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.