पुणे : आषाढी वारीनिमित्त साबुदाणा, भगरीच्या मागणीत वाढ झाली आहे. यंदा तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात साबुदाण्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून, साबुदाण्याच्या दरात किलोमागे सात ते आठ रुपयांनी घट झाली आहे. भगरीला मागणी चांगली असून, दरात किलोमागे आठ ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे.
देशात साबुदाण्याची लागवड फक्त तामिळनाडूत होते. तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात साबुदाण्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथून संपूर्ण देशभरात साबुदाणा विक्रीस पाठविला जातो. गेल्या हंगामात पाऊस चांगला झाल्याने साबुदाण्याच्या लागवडीत वाढ झाली आहे. यंदा साबुदाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. घाऊक बाजारात साबुदाण्याच्या दरात किलोमागे सात ते आठ रुपयांनी घट झाली आहे. आषाढी वारी सुरू झाल्यानंतर साबुदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
सर्वाधिक मागणी आषाढी एकादशीला राहणार आहे. आषाढी एकादशीनंतर सणवार सुरू होतात. श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात साबुदाणा, भगरीला मागणी वाढणार आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात सध्या दररोज तामिळनाडूतून ८० ते ९० टन एवढी साबुदाण्याची आवक होत आहे, असे मार्केट यार्ड भुसार बाजारातील साबुदाणा व्यापारी आशिष दुगड यांनी सांगितले.भगरीच्या मागणीत गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली आहे. भगरीचा समावेश ‘मिलेट’ प्रकारात करण्यात आला आहे. सणांना सुरुवात झाल्यानंतर साबुदाणा, भगरीच्या मागणीत आणखी वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले.
घाऊक बाजारातील साबुदाण्याचे क्विंटलचे दर
वर्ष क्विंटलचे दर
२०२४ : ६१०० ते ६३०० रुपये
२०२५ : ५१०० ते ५३०० रुपये
शेंगदाणे स्वस्त
आषाढी वारीमुळे शेंगदाण्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. यंदा शेंगदाण्याचे उत्पादन चांगले झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शेंगदाण्याच्या दरात पाच ते आठ टक्क्यांनी घट झाली आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशातून शेंगदाण्याची आवक होत आहे. प्रतवारीनुसार, शेंगदाण्याचे दर १२० ते ९५ रुपयांपर्यंत आहेत, असे शेंगदाणा व्यापारी गणेश चोरडिया यांनी सांगितले.