पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएसटी पथकातील पोलिसाने मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने चालकाने दोन पोलिसांना धडक दिली. एका पोलिसाला २० फुटापर्यंत सुरक्षा कठड्यासह (बॅरिकेट) फरफटत नेले. ही घटना निगडीतील भक्ती शक्ती चौक येथे शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) मध्यरात्री घडली.

संतोष सावळेराम शिंदे, श्याम पंढरीनाथ लोणारकर अशी जखमींची नावे आहेत. पोलीस शिपाई शिंदे यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल

फिर्यादी संतोष शिंदे हे पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी निवडणूक विभाग व पोलिसांकडून निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भक्ती-शक्ती चौक येथे वाहन तपासणी पथक तैनात केले आहे. त्या पथकाचे प्रमुख श्याम लोणारकर असून संतोष शिंदे हे या पथकात बंदोबस्तासाठी हजर होते.

हेही वाचा – प्रचाराचा प्रवास… तालीम ते गुन्हेगारी टोळ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एक मोटार भरधाव वेगात आली. त्यामुळे शिंदे यांनी चालकाला मोटार थांबण्यास सांगितले. मात्र चालकाने मोटार न थांबवता बॅरिकेटला धडक देऊन शिंदे यांना वीस फुटापर्यंत फरफटत नेले. तसेच एसएसटी पथक प्रमुख लोणारकर यांना जखमी केले. यानंतर संबंधित मोटार चालक घटनास्थळावरून पळून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.