पुणे : ‘कल्पकता, कल्पनारम्यता आणि निखळ विनोद या त्रिसूत्रीतून शि. द. फडणीस यांनी रंगवलेली ‘हसरी गॅलरी’ आपल्याला भावते. मुलांची गणिताची आणि बायकांची लठ्ठपणाची भीती घालवणाऱ्या फडणीस यांच्या चित्रांमध्ये कला आणि कल्पनांचा अनोखा मेळ आहे,’ असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी सोमवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या शंभरीपूर्तीनिमित्त वसुंधरा क्लब आणि कार्टूनिस्ट्स कम्बाइन यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या ‘शि. द. १००’ महोत्सवातील ‘शि. द. : कला आणि कल्पना’ या विषयावरील चर्चासत्रात गोडबोले बोलत होत्या. प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर या चर्चासत्रात सहभागी झाले होते. त्यांच्याशी चारुहास पंडित यांनी संवाद साधला.

गोडबोले म्हणाल्या, ‘निरपेक्षपणे पाठराखण करणारे व्यक्तिमत्त्व आता कलाकारांना कितपत मिळतात. ‘हंस’च्या विनोद विशेषांकासाठी फडणीस यांनी पहिल्यांदा चित्र केले. एक गुणदर्शी संपादक एका कलाकाराला कशी संधी देतो याचे अंतरकर हे आदर्श उदाहरण आहेत आणि फडणीस यांनी त्याचे सोने केले. व्यंगचित्रांच्या माध्यमातून फडणीस यांनी समाजातील विसंगती आणि विकृतींवर बोट ठेवले. व्यंगचित्रकला समजून घेण्यासाठी साक्षरतेची गरज आहे, याचा ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात.’

कुलकर्णी म्हणाले, ‘चित्रकला ही स्वतंत्र भाषा असून, हास्यचित्र ही फडणीस यांची एक बोली आहे. चित्रकाराची एक नजर असते. भाषा आणि विचारांचा अभ्यास तर लागतोच; पण, आपली रेषा ओळखता येणे महत्त्वाचे असते. रेषेचा पोत, दर्जा समजणे गरजेचे असते. फडणीस यांनी चित्राला साजेशी अक्षरे केली. त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या रंगलेपनात दिसते. रेषेचे कागदावरील चित्राशी असणाऱ्या प्रमाणाला महत्त्व असते. त्या संदर्भात फडणीस हे मोठे विद्यापीठ आहेत. कला महाविद्यालयात व्यंगचित्र विषयाला का दूर ठेवले गेले हे समजत नाही. व्यक्तिचित्रे आणि निसर्गचित्रे म्हणजेच चित्रकला ही गंभीर परिस्थिती आहे.’

जोशी म्हणाले, ‘द. मा. मिरासदार यांच्यामुळे माझा फडणीस यांच्याशी परिचय झाला. ‘हसण्यावारी’ पुस्तकाचे मुखपृष्ठ करण्याची विनंती करण्यासाठी मी त्यांना भेटलो आणि त्यांनी आनंदाने संमती दिली. नव्या लेखकाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नावाजलेला व्यंगचित्रकार पुढाकार घेतो हे भाग्य मी अनुभवले. विविध कलांचा आस्वाद घेणे आणि त्यांचा आदर करण्याचा गुण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. निखळ, निर्मळ आणि खेळकर असा त्यांचा स्वभाव आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकणीकर म्हणाले, ‘लहानपणापासून ज्यांची चित्रे पाहत आलो त्या फडणीस यांच्याशी १९९२ मध्ये माझा परिचय झाला. पहिल्या भेटीत अनुभवलेला त्यांचा तरतरीतपणा आणि सजगता, तसेच तंत्रज्ञानस्नेही दृष्टिकोन आजही कायम आहे.’