पुणे : ‘‘मराठी रंगभूमीला नव्या दमाच्या संहितांची आवश्यकता आहे. महेश एलकुंचवार आणि सतीश आळेकर हे नाटककार गेली अनेक वर्षे नाटके लिहितच आहेत. पण, त्यानंतरच्या काळात नव्या दमाची नाटके रंगभूमीवर सादर होणे गरजेचे आहे’’, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी रविवारी व्यक्त केले. ‘‘रंगभूमीवर नव्या दमाच्या नाटकांसाठी विलंबित ख्यालाचा दमसास परवडणारा नाही,’’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उन्मेष प्रकाशनच्या वतीने प्रमोद काळेलिखित ‘ऐल ना पैल’ या कथासंग्रहाचे प्रकाशन अतुल पेठे आणि प्रसिद्ध अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी पेठे बोलत होते. प्रकाशक मेधा राजहंस या वेळी व्यासपीठावर होत्या. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले आणि अभिनेता आस्ताद काळे यांनी संग्रहातील दोन कथांचे अभिवाचन केले.

पेठे म्हणाले, ‘’अस्वस्थता आहे ते सांगण्यातून कलेची निर्मिती होते. प्रमोद काळे हे नाटकवाले आहेत तर, त्यांनी नाटक लिहायला हवे होते. मग त्यांनी कथालेखनाचा मार्ग का स्वीकारला? कलाकारांची मोट बांधून सध्या नाटक करणे हे अवघड झाले आहे. म्हणूनच कदाचित त्यांनी कथालेखनाचा पर्याय निवडला असावा.

लेखनामध्ये आपण आणि कागद यांच्यातील संवाद एकतर्फी असतो. संग्रहातील कथांमध्ये नाटकाची आणि एकांकिकेची बीजे आहेत. यात नाट्य आहे. पण, ते कथात्म नाट्य आहे. घाबरलेला मध्यमवर्गीय माणूस हा कथेचा नायक आहे. या लेखनामध्ये साधेपणा, सच्चेपणा आणि प्रभावीपणा आहे. पण, तरीही रंगभूमीवर नव्या दमाच्या नाटकांची आवश्यकता ध्यानात घेता प्रमोद काळे यांनी नाटक लिहावे, अशीच मी त्यांना विनंती करेन.”

गोष्ट सांगण्याचे देखणेपण हे माणसाला लाभलेले वरदान आहे. कथांतून माणूसपणाचे वेगवेगळे कंगोरे आणि पदर उलगडतात. कथा वाचन मला सहिष्णुतेचा अवसर देत असते. त्या कथांच्या वाचनातून मला माझ्या पद्धतीने अर्थ लावण्याची संधी देतात. इतकेच नव्हे तर, कथेमध्ये नसलेला अर्थ शोधण्याचे बळ ही अक्षरे देतात. – गिरीश कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेता-लेखक.