पुणे : धृपद आणि ख्यालगायन श्रवणाची अनोखी पर्वणी रसिकांनी ‘संगीत संध्या’ कार्यक्रमात अनुभवली. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सवाई गंधर्व यांचे नातू आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. श्रीकांत देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शीला देशपांडे आणि पं. श्रीकांत देशपांडे मित्रमंडळ यांच्या वतीने ‘संगीत संध्या’ या विशेष संगीत मैफलीमध्ये पं. उदय भवाळकर आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाची मैफल झाली. ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर, व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये, संवादिनी वादक पं. प्रमोद मराठे, तबलावादक पं. पांडुरंग मुखडे, गोविंद बेडेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार या वेळी उपस्थित होते.
‘यमन’ रागगायनाने कार्यक्रमाची सुरुवात केल्यानंतर उदय भवाळकर यांनी ‘तुमबिन कौन मेरी’ ही ‘कलावती’ रागातील बंदिश सादर केली. त्यांना प्रताप आव्हाड यांनी पखवाजची साथ केली. ‘शामकल्याण’ रागातील दोन बंदिशीनंतर आरती अंकलीकर-टिकेकर यांनी एकतालातील तराणा सादर केला. त्यानंतर ‘दिल बहार’ हा भैरवी टप्पा आणि ‘भैरवी प्रियदर्शिनी’ ही गाजलेली भैरवी सादर करून, त्यांनी या संगीत संध्येची सांगता केली. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीची, भरत कामत यांनी तबल्याची तर अनुराधा मंडलिक आणि श्रद्धा गद्रे यांनी तानपुरा व स्वरसाथ केली. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले.
मी पुण्यात आल्यावर १९९७ मध्ये पं. श्रीकांत देशपांडे यांच्याशी परिचय झाला. त्याच वर्षी मी सवाई गंधर्व संगीत महोत्सवात प्रथम गायलो. तेव्हापासून अतिशय प्रेमाने तानपुरे लावून देणे, सर्व व्यवस्था पाहण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला नेहमीच लाभले. पं. उदय भवाळकर, धृपदगायक