शहरातील लोखंडी जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ होत असल्याने कारवाईचा इशारा दिल्यानंतर एकाच दिवसात १ हजार ६०० जाहिरात फलकांचा स्थापत्य लेखापरीक्षण अहवाल परिमंडळ उपायुक्तांकडे अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यात आले. दरम्यान, ३९० जाहिरात फलकांचे अहवाल प्राप्त न झाल्याने ते अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

हेही वाचा >>> अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईस टाळाटाळ; परवाना निरीक्षकांवर अशी झाली कारवाई

किवळे येथे गेल्या महिन्यात जाहिरात फलकाचा लोखंडी सांगाडा (होर्डिंग्ज) पडून झालेल्या दुर्घटनेनंतर शहरातील सर्व जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण संबंधित व्यावसायिकांकडून परिमंडळ उपायुक्तांनी करून घ्यावे, असा आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता. मात्र, स्थापत्य लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ होत असल्याने परिमंडळ उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. तसे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी जाहीर केले होते. या परिपत्रकानंतर एकाच दिवसात १ हजार ६०० जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षणाचे अहवाल तातडीने सादर करण्यात आले.यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांच्या दालनात एक बैठक झाली. त्यामध्ये ३९० जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण झाले नसल्याचे सांगण्यात आले. अहवाल सादर न झालेल्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश डाॅ. कुणाल खेमनार यांनी दिले. दरम्यान, शहरात एकूण २ हजार २१४ अनधिकृत जाहिरात फलकांची नोंद असून त्यापैकी १ हजार २४७ जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरीत ९४७ अनधिकृत जाहीरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेशही आकाशचिन्ह आणि परवाना विभागाला देण्यात आले आहेत.