पुणे : ‘समाजातील जात-वर्ण भेदाभेद, स्त्री-पुरुष असमानता ही बुरसटलेली विचारसरणी दूर करून साहित्यिकांनी समाजाला मानवतेकडे वळविण्यासाठी दर्जेदार साहित्य निर्माण करणे गरजेचे आहे. तरच, मराठी साहित्याला वैश्विक उंची प्राप्त होईल’, असे मत ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी रविवारी व्यक्त केले. ब्राह्मण समाजाबद्दल द्वेष निर्माण करण्याची व्यवस्था प्रथम बंद करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
श्रीविद्या प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते डाॅ. गिरीश ओकलिखित ‘चिवित्रा’ पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन गायकवाड आणि खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी गायकवाड बोलत होते. श्रीविद्या प्रकाशनच्या श्रीती कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या.
गायकवाड म्हणाले, ‘साहित्यिक हा समाजाचे हित जपणारा आणि जोपासणारा असतो. महाराष्ट्राला पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, डाॅ. श्रीराम लागू, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान यांसारख्या साहित्यिकांचे योगदान लाभले आहे. त्यांचा मोठेपणा हा त्यांच्या लेखणीतून मिरवला गेला. स्त्री – पुरुष असमानता दूर करण्यासाठी दुर्गा भागवत, विद्या बाळ यांचे मोठे योगदान लाभले. मराठी भाषा सुसंस्कृत असून, अभिजात दर्जा मिळाला असताना आता वैश्विक उंची प्राप्त करून देण्यासाठी समाजातील बुरसटलेली विचारसरणी दूर करण्यासाठी योगदान महत्त्वाचे आहे. तरच जात-वर्ण, धर्म-पंथ विसरून माणसे जवळ येतील. समाज बदलत असून, मानवतेच्या दृष्टीने दर्जेदार साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे.’
सध्या रंगभूमीची नाळ पुणे-मुंबईच्या पलीकडे जात नसल्याची खंत डाॅ. कोल्हे यांनी व्यक्त केली. डाॅ. ओक यांनी ही नाळ अजूनही जपून ठेवली असल्याचे सांगत कोल्हे यांनी ओक यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. ‘‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीमुळे माझ्यातील लेखक घडला’, अशी कृतज्ञता ओक यांनी व्यक्त केली. वाचनाची आवड आणि लेखनाची हातोटी रंगभूमीवर काम करताना फायदेशीर ठरली, असे सांगत त्यांनी पुस्तकातील निवडक लेखाचे वाचन केले.
आयोगावरील प्रश्नांना भाजप नेत्यांकडून उत्तरे..
‘लोकशाही आणि राज्यघटनेच्या दृष्टीने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे देणे ही निवडणूक आयोगाची नैतिक जबाबदारी होती. त्याऐवजी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील नेते याविषयी भाष्य करत आहेत,’ अशी टीका डाॅ. कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. ‘बिहार विधानसभा निवडणुकीची परिस्थिती पाहिली, तर नक्कीच देशाच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांच्या मतांचा आदर आणि राज्यघटनेचे रक्षण होईल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.