पुणे : ‘संभाजी’ या कादंबरीत छत्रपती संभाजी महाराजांबाबत लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुराबाबत कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे सुनावणीस उपस्थित राहण्यासंदर्भात समन्स आणि सक्तीने हजर राहण्याचा आदेश बजावूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील सलग दोन सुनावणीस गैरहजर राहिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहता येणार नसल्याचा अर्ज पाटील यांनी वकिलामार्फत आयोगाला दिला आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी एक डिसेंबर रोजी होणार आहे.
‘छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर गोविंद नावाच्या व्यक्तीने अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख पाटील यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीमध्ये आहे. मात्र, त्या संदर्भात कोणतेही समकालीन ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसल्याने विश्वास पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात यावे,’ अशी मागणी वढू बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने ॲड. मंगेश देशमुख यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे केली आहे.
आयोगाने सप्टेंबर महिन्यात पाटील यांना हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्या वेळी बिहार येथील पुस्तक महोत्सवासाठी जात असल्याचे त्यांनी कळवले. त्यामुळे आयोगाने त्यांना गेल्या सोमवारी (२७ ऑक्टोबर) उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले. मात्र, सोमवारीही पाटील सुनावणीस गैरहजर राहिले. त्यानंतर आयोगाने पाटील यांना सक्तीने हजर राहण्याचा आदेश (जामीनपात्र वाॅरंट) बजावला. मात्र, बुधवारीही ते सुनावणीस गैरहजर राहिले. पाटील आजारी असल्याचा अर्ज त्यांच्या वकिलाकडून देण्यात आला.
विश्वास पाटील यांच्या वतीने ॲड. मल्लिकार्जुन शाक्य यांनी सुनावणीस अनुपस्थित राहण्यासंदर्भातील अर्ज आयोगाला सादर केला आहे. पाटील वैद्यकीय उपचारांसाठी कोकणात असल्याचे अर्जात म्हटले आहे. ‘या प्रकरणाची पुढील सुनावणी एक डिसेंबर रोजी होणार आहे. जामीनपात्र वाॅरंट रद्द करण्याबाबतही पाटील यांच्या वतीने वकिलांनी अर्ज दिला आहे,’ अशी माहिती ॲड. मंगेश देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
