परदेशात वाढत असलेल्या बीए.७ रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर ७९,६८८ प्रवासी आले असून त्यांपैकी १४६६ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीतून तीन प्रवाशांना करोना संसर्गाचे निदान झाले असून त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत. यांपैकी पुणे आणि गोव्याचा रहिवासी असलेले दोन प्रवासी मंगळवारी झालेल्या सर्वेक्षणात आढळले असून गुरुवारी आढळलेला तिसरा प्रवासी हा नवी मुंबईचा रहिवासी आहे.

हेही वाचा >>>पुणे: भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. आवटे म्हणाले,की चीन, अमेरिका, ब्राझील, फ्रान्स या देशांतील वाढत्या बीएफ.७ रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा भाग म्हणून देशात दाखल होणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी तर इतरांची केवळ लक्षण तपासणी (थर्मल स्क्रीनिंग) करण्यात येत आहे. गुरुवारपर्यंत तपासलेल्या १४६६ नमुन्यांपैकी तिघे जण करोनाग्रस्त आहेत. हे तिन्ही प्रवासी पूर्णत: लक्षणविरहित आहेत. यावरून संसर्गाच्या प्रसाराचा सौम्यपणा लक्षात येतो. तिन्ही प्रवाशांचे वैद्यकीय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना असलेला संसर्ग ओमायक्रॉन विषाणू्च्या कोणत्या उपप्रकारामुळे झाला आहे, हे स्पष्ट होईल, याकडे डॉ. आवटे यांनी लक्ष वेधले.