पुणे : धान्यापासून इथेनॉल निर्मितीबरोबरच उपपदार्थांच्या साहाय्याने जैव सीएनजी हरित हायड्रोजन यांसारखी अत्याधुनिक पुनर्निर्मित ऊर्जा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच ‘बायो सीएनजी’ धोरण जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी केली.

‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ (विस्मा) तर्फे ‘भारतीय साखर उद्योगातील परिवर्तन आणि भविष्याचा मार्ग’, ‘साखर आणि संबंधित उत्पादनांच्या निर्मिती आणि प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर’, ‘हरित हायड्रोजन उत्पादन साखर उद्योगासाठी समृद्धी क्षितिज’ या विषयांवर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महासचिव डॉ. पांडुरंग राऊत, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शहाजीराव भड, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, कृषिशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, जैवऊर्जा तज्ज्ञ डॉ. संजय पाटील यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘उसाच्या भुशापासून वीजनिर्मिती, मळीपासून इथेनॉल निर्मिती, इथेनॉलपासून विमानाचे इंधन, कारखान्यातील सांडपाण्यापासून आणि घाणचिखलापासून बायोगॅस आणि त्यापासून बायो सीएनजी आणि ग्रीन हायड्रोजन असे टाकाऊतून टिकाऊ निर्मिती केली जात आहे. आता भविष्यातील इंधन साखर उद्योगांमधून निर्माण होणार असल्याचे जगाचे लक्ष याकडे लागले आहे. सद्य:स्थितीला राज्य सरकारने हरित हायड्रोजनचे धोरण जाहीर करून भरीव अनुदान व प्रोत्साहनात्मक योजना लागू केल्या आहेत.’

यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (पुणे), जयवंत शुगर्स (सातारा), श्री गुरूदत्त शुगर्स (कोल्हापूर), द्वारकाधिश साखर कारखाना (नाशिक), दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रिज (कोल्हापूर) आणि नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रिज (धाराशिव) या कारखान्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला.

साखर उद्योगांचे ऊर्जा उद्योगांमध्ये रूपांतर

‘राज्यात १३३ खासगी साखर कारखाने कार्यरत असून राज्यातील एकूण साखर उत्पादनाच्या ५० टक्के साखर उत्पादन, ७० टक्के इथेनॉल उत्पादन व ६० टक्के कोजन पॉवर यांचे उत्पादन या कारखान्यांमधून होते. सध्या साखर उद्योग आर्थिकदृष्ट्या संकटामध्ये असला, तरी भविष्य उज्ज्वल आहे. साखर उद्योगाचे रूपांतर परिवर्तन ऊर्जा उद्योगांमध्ये झाले आहे,’ असेही पाटील यांनी सांगितले.