छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक व्यक्ती ३० वर्ष आपल्या इथे राहून सर्व व्यवस्था समजून, परदेशात गेला. मात्र त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यातील काही जाणकार लोक जपान किंवा इतर देशात का पाठवले नाहीत? जर महाराजांनी तिथे आपले काही लोक पाठवले असते तर तेथील तंत्रज्ञानाची अधिक माहिती मिळाली असती, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. महाराजांनी जाणकार लोकांना परदेशात पाठवयाला पाहिजे होते असं आजही वाटतं. मात्र त्यांनी ती का पाठवली नाहीत याच मला नवल वाटतं, अशी भावनाही पुरंदरे यांनी व्यक्त केली. महाराजांनी असं केलं असतं तर पुढील पिढीला आणखी फायदा झाला असता, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी पूर्ण केल्याच्या निमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आहेत. ते कुठल्या गल्लीतले, बोळातले, जातीतले, धर्मातले नाहीत. तर ते जगाचे आहे. त्याहीपेक्षा सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीत शिवाजी महाराजांचं चरित्र मार्गदर्शक ठरणारे असून शिवाजी महाराजांनी आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आणि राष्ट्रीय विचार दिला”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन आताच्या पिढीने पुढे जाण्याची गरज असल्याचेही बाबासाहेब पुरंदरेंनी यावेळी सांगितले. “मी पहाटे गजर न लावता उठतो आणि कामाला सुरुवात करतो. त्यातील प्रमुख भाग म्हणजे मी सदैव वाचन करतो. तसेच आज ही सोनियाचा दिनु हा लताबाईंनी गायलेला अभंग मी रोज ऐकतो,” असंही ते म्हणाले. “माझ्या आयुष्यात माणसं ही सर्वात मोठी मिळकत असूनच ही माणसच मी कमवली आहेत. त्याचबरोबर आपल्या राज्यात ३५२ किल्ले असून मी सुमारे २१० किल्ले पाहिलेत. सगळ्या किल्ल्यांचा उद्धार करणे अव्यवहार्य आहे. परंतु किमान २५ किल्ले आपण चांगल्याप्रकारे जतन करायला हवेत,” अशी भावना बाबासाहेबांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आपल्याला अजूनपर्यंत कळलेल्या नाहीत, अशी खंतही बाबासाहेब पुरंदरेंनी बोलून दाखवली. “आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खूप बोलतो. पण महाराजांची आई आपल्याला अजूनपर्यंत कळलेली नाही,” असं मत बाबासाहेबांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केलं.