पिंपरी- चिंचवड : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत महायुतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. मावळमध्ये मामा- भाचा यांच्या राजकारणामुळे तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत महायुती होणार की नाही? अशी परिस्थिती होती. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशांनंतर भाजपची युती झाली. वरवर मामा बाळा भेगडे आणि भाचा आमदार सुनील शेळके यांच्यात दिसणारे प्रेम हे पुतना मावशीसारखे आहे.

लोणावळ्यात माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यामुळे महायुती फिस्कटली. वडगाव नगरपंचायतीत देखील महायुती होऊ शकली नाही. लोणावळ्यात भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहेत. सेना- रिपाई यांची युती आहे. तळेगावमध्ये मात्र माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना शह दिल्याची चर्चा आहे. भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

आमदार सुनील शेळके यांचा एक शिलेदार बिनविरोध निवडून आला आहे. भाजपचे दीपक भेगडे, शोभा परदेशी आणि निखिल भगत हे बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या हेमलता खळदे बिनविरोध निवडून आल्या आहेत. बाळा भेगडे यांनी भाजपच्या बिनविरोध उमेदवारांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

महायुतीकडून संतोष दाभाडे, महाविकास आघाडीकडून विशाल वाळुंज, भाजपचे नाराज गटाचे अपक्ष उमेदवार किशोर भेगडे, काँग्रेस पक्षाचे नाराज गटातील अपक्ष उमेदवार रंजना भोसले हे तळेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.

तळेगाव नगरपरिषदेसाठी १३४ उमेदवारी अर्ज आले आहेत. या अर्जांची मंगळवारी छाननी होणार आहे. १९ ते २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज घेण्याची मुदत आहे. त्यांनतर अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.