पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०अंतर्गत नव्या अभ्यासक्रमानुसार दर्जेदार पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे (बालभारती) पहिल्यांदाच ‘पाठ्यपुस्तक लेखन-उद्बोधन सत्र’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात २२ आणि २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यशाळेत ५००हून अधिक शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार असून, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेत ज्येष्ठ गणितज्ञ, अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठाचे प्रा. मंजुळ भार्गव, अझीम प्रेमजी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग बेहर, राष्ट्रीय पाठ्यक्रम, अध्ययन, अध्यापन समितीचे (एनएसटीसी) कार्यक्रम अधिकारी गजानन लोंढे, परखच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंद्राणी भादुरी, डॉ. मधुश्री सावजी आदी मार्गदर्शन करणार आहेत.

बालभारतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके प्रकाशित केली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. सध्या या पाठ्यपुस्तकांचे काम सुरू आहे.

कार्यशाळेबाबत ओक म्हणाल्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या अंतर्गत राज्यात नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्यात येत आहेत. शिक्षण धोरणात व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षा, मूल्यमापन पद्धती, अध्ययन निष्पत्ती यांचा विचार करून गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तके करणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांची रचना विचारात घेऊन राज्यातही प्रभावी आणि दर्जेदार पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या उद्देशाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, भारतीय ज्ञान प्रणाली, पंचकोशीय विकास, सर्व विषयांची पाठ्यपुस्तके गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होण्यासाठीचे विचारमंथन, अभ्यास मंडळ सदस्यांची क्षमतावृद्धी करण्यावर कार्यशाळेत भर दिला जाणार आहे. त्यासाठी विविध सत्रे होणार आहेत.