बाणेर – बालेवाडी परिसरातील वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. गेल्या काही वर्षात या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. अनेक सोयी सुविधा येथे निर्माण झाल्या आहेत. मात्र ही स्थिती असताना या परिसरात होणारी वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकांसह नागरिक हवालदिल झाले आहेत.
बाणेर परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे तासनतास वाहन चालकांना वाहतूक कोंडी ताटकळत थांबावे लागते. या वाहतूक कोंडीवर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील नागरिकांच्या पदरी निराशाच पडत होती. मात्र आता गेल्या अनेक वर्षांपासून बाणेर परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
बाणेर येथील हॉटेल पॅन कार्ड क्लब व धनकुडे वस्ती परिसराकडे जाणाऱ्या मुख्य चौकात नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होते. येथे असलेल्या अरुंद रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांसह हजारो रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर आवश्यक उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी, येथील नागरिकांनी महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी बाबुराव चांदेरे यांच्याकडे केली होती.
चांदेरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या सोबत या ठिकाणी जाऊन पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणीत येथील परिस्थिती जाणून घेतल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर ठोस निर्णय घेण्याची दिशा निश्चित करण्यात आली.
या चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी येथे रस्ता रुंदीकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे महापालिका प्रशासनाने या पाहणीनंतर स्पष्ट केले. या भागातील रस्ता रुंद करण्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रस्तावित रस्त्यामध्ये जागा जाणाऱ्या मूळ जागा मालकांशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांना न्याय मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले. विकासकामे करताना नागरिकांचे हित, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया या तत्त्वांचे पालन करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेनंतर हा रस्ता थेट मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना दररोजच्या कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. या पाहणी दरम्यान सोसायट्यांमधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ २ चे संतोष वारुळे, सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अधिक्षक अभियंता (पाणी पुरवठा) प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जयवंत पवार, अधिक्षक अभियंता (पथ विभाग) अभिजित आंबेकर, प्रकाश पवार, रमेश वाघमारे, दिलीप काळे, योगिता भांबरे, शिवानंद पाटील, प्रल्हाद पवार या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
या पाहणी दौऱ्याबाबत बोलताना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले, “बाणेरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागात पायाभूत सुविधा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. रस्ते रुंद आणि सुरक्षित असतील तरच विकासाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. नागरिकांच्या मागणीनंतर सुरू झालेली ही प्रक्रिया केवळ वाहतुकीचा प्रश्न सोडवणार नाही, तर परिसराच्या विकासाला नवा वेग देणार आहे. रस्त्यामध्ये येणाऱ्या जागांबाबत मूळ जागा मालकांशी सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांना पुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत योग्य न्याय्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बाणेर परिसराच्या सर्वांगीण विकासातील हा टप्पा निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.”