बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पॅनेलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि स्थानिक आघाडी यांच्यात रंगत असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच नेतृत्वात गेली २५ वर्षे बारामती नगरपरिषदेचा कारभार चालत आला आहे. तत्पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार हे पालिकेच्या राजकारणात लक्ष घालत होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याकडे जबाबदारी सोपविली. तेव्हापासून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पालिकेचा कारभार चालू आहे.
२०१६ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी एकसंध होती. त्यावेळी राष्ट्रवादी विरुद्ध अन्य पक्ष अशी लढत झाली होती. भाजप-शिवसेनेने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. काही अपक्ष उमेदवार निवडणुकीला उभे होते. त्यात ३९ जागांपैकी ३५ जागा राष्ट्रवादीने जिंकत एकहाती वर्चस्व मिळविले होते. यंदा पालिकेच्या दोन जागा वाढल्या आहेत.
बारामतीत गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांचेच एकहाती वर्चस्व आहे. येथे राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. नगराध्यक्षपदासाठी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे नाव पुढे घेतले जात आहे. याशिवाय किरण गुजर, जयसिंग देशमुख, जय पाटील, संजय संघवी, सुभाष सोमाणी आदी मंडळी नगराध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’कडून इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकरणी अंतिम निर्णय घेणार आहेत. ते ज्याला संधी देतील तोच बारामतीचा पुढील नगराध्यक्ष असेल हे निश्चित आहे. कारण अन्य पक्षांची येथे फारशी ताकद नाही.
आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहे. या पक्षाची काही प्रमाणात बारामतीत ताकद आहे. ते बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य मित्रपक्षांना बरोबर घेवून स्थानिक आघाडी करत निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहेत. त्यामुळे काही प्रभागात चुरशीच्या निवडणुका होतील, अशी स्थिती आहे.
२० प्रभागांमध्ये लढत
बारामती नगरपरिषदेसाठी २० प्रभाग आहेत. एक ते १९ प्रभागात प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून येणार आहेत. तर क्रमांक २० च्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील. नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार असल्याने एक ते १९ प्रभागातील मतदारांना तीन तर प्रभाग २० मध्ये मतदारांना चार मते देता येतील.
